Sonu Nigam Shares His Last Wish : सोनू निगम हा बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक आहे. आजवर त्यानं अनेक गाणी गात त्याच्या सुमधुर आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या सोनू निगम ‘केसरी बंधन’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. अशातच गायकानं काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान त्याची एक इच्छा व्यक्त केली होती.
सोनू निगमनं आजवर हिंदीसह मराठी, कन्नड यांसारख्या इतर प्रादेशिक भाषांमध्येही बरीच गाणी गायली आहेत. तो प्रसिद्धीझोतात आला ते त्यानं गायलेल्या ‘अच्छा सिला दिया या’ गाण्यामुळे. त्या काळी या गायकाचं हे गाणं खूप गाजलं होतं. तसेच तो ‘अभी मुझमे कहीं’ या गाण्यामुळेही चांगलाच चर्चेत आला होता. अशातच सोनू निगमनं एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या आवडत्या गाण्याबद्दल सांगितलं आहे.
सोनू निगमनं ‘मिर्ची प्लस’च्या कार्यक्रमादरम्यान त्याच्या आवडत्या गाण्याबद्दल सांगितलं होतं. यावेळीच त्यानं त्याची एक इच्छादेखील व्यक्त केली होती. सोनू निगम म्हणालेला, “जेव्हा माझं निधन होईल आणि टीव्हीवर प्रसिद्ध गायक सोनू निगमचं निधन, असं लिहून येत असेल तेव्हा त्यामागे बॅकग्राऊंडला हे गाणं ऐकवलं जावं, अशी माझी इच्छा आहे”.
सोनू निगम याबाबत बोलताना पुढे म्हणाला, “या गाण्यापेक्षा माझ्यासाठी दुसरं कोणतंही गाणं खास नाहीये”. सोनू निगमने या वर्षी ३१ मार्च रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या संदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यानं त्याच्या आवडत्या गाण्याबद्दल सांगितलं असून, ते गाणंसुद्धा गायलं आहे. त्यानं त्या कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘हर घडी बदल रही हैं’ हे गाणं गायलेलं शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं.
सोनू निगमनं आजवर विविध चित्रपटांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. ‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार त्यानं प्रामुख्यानं हिंदी व कन्नड भाषेतून जवळपास सहा हजारहून अधिक गाणी गायली आहेत. सोनू निगमनं ‘संदेसे आते हैं’, ‘पापा मेरे पापा’, ‘दिल डूबा’, ‘अब तुम्हारे हवाले’, ‘बोले चुडियां’, ‘भगवान हैं कहा’, ‘मेरे यार की शादी हैं’, ‘राम जाने’, ‘जाने नही देंगे’, ‘इश्क विश्क प्यार व्यार’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘पापा मेरी जान’ यांसारखी गाजलेली गाणी गायली आहेत.
दरम्यान, सोनू निगमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या अरिजित सिंहसह ‘बॉर्डर २’ चित्रपटातील गाण्यांसाठी काम करत आहे. त्यासह ‘केसरी वीर’, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’, ‘जिंदगी ऑन द रॉक्स’ या चित्रपटांतील गाण्यांच्या कामात व्यग्र आहे.