Sitaare Zameen Par Box Office Collection Day 1 : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतिक्षीत ‘सितारे जमीन पर‘ हा चित्रपट अखेर शुक्रवारी (२० जून २०२५ रोजी) रिलीज झाला. ‘लाल सिंग चड्ढा’च्या रिलीजनंतर आमिरने ब्रेक घेतला होता. तीन वर्षांनंतर आमिर पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला आहे. आमिर मागील अनेक दिवसांपासून ‘सितारे जमीन पर’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? ते जाणून घेऊयात.

आमिर खान व जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सितारे जमीन पर’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, ‘सितारे जमीन पर’ने भारतात सर्व भाषांमध्ये पहिल्या दिवशी ११.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनची अधिकृत आकडेवारी आल्यानंतर त्यात थोडा फरक असू शकतो.

‘तारे जमीन पर’चे ओपनिंग कलेक्शन किती होते?

‘सितारे जमीन पर’ हा आमिर खानच्या २००७ साली आलेल्या हिट चित्रपट ‘तारे जमीन पर’ चा सिक्वेल आहे. ८० कोटी रुपयांचे बजेट असलेला ‘सितारे जमीन पर’ चित्रपट पहिल्या दिवशी सुमारे ३० कोटी रुपये कमाई करेल, असे अंदाज व्यक्त केले जात होते, परंतु बॉक्स ऑफिस कलेक्शन अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे वीकेंडला कमाईत वाढ होऊ शकते. ‘तारे जमीन पर’ने ‘सितारे जमीन पर’च्या तुलनेत २००७ मध्ये प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवशी २.६२ कोटी रुपये कमावले होते. तेव्हा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सितारे जमीन पर’मधील कलाकार

आरएस प्रसन्ना दिग्दर्शित आणि आमिर खान प्रॉडक्शन निर्मित, ‘सितारे जमीन पर’मध्ये 10 नवोदित कलाकार आहेत – आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर.