Somy Ali: अभिनेत्री सोमी अलीने आदित्य पांचोली आणि त्याचा मुलगा सूरज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अलीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सूरज पांचोली आणि आदित्य पांचोली या दोघांवरही आरोप केले आहेत. जिया खान या अभिनेत्रीने सूरज पांचोलीमुळेच आत्महत्या केल्याचाही आरोप सोमी अलीने केला आहे.
काय म्हटलं आहे सोमी अलीने?
आदित्य पांचोली हा माणूस अत्यंत विचित्र आहे, तसंच तो अतिशय घृणा वाटेल असा माणूस आहे. तो कायमच महिलांना मारहाण करतो, शिवीगाळ करतो.
आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज हा अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहे. २०१३ मध्ये जियाने त्याच्यामुळेच आत्महत्या केली.
आदित्य पांचोली महिलांची फसवणूक करतो, त्यांचा विश्वासघात करतो. त्यांनी आवाज उठवला की त्यांना मारहाण करतो असाही आरोप सोमी अलीने केला आहे.
२०१३ मध्ये जिया खानचा मृत्यू
२०१३ मध्ये अभिनेत्री जिया खानचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह तिच्या मुंबईतल्या घरात आढळला होता. त्यावेळी या प्रकरणात सूरज पांचोली हा आरोपी ठरला होता. सूरज पांचोलीने जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वर होता. या प्रकरणाची माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. २८ एप्रिल २०२३ ला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सूरज पांचोलीची या गुन्ह्यातून मुक्तता केली. या प्रकरणानंतर तीन वर्षांनी सोमी अलीने हे आरोप केले आहेत. सोमी अलीने आता या संदर्भात थेट सूरज पांचोली आणि आदित्य पांचोलीवर आरोप केले आहेत. तिने या संदर्भातली पोस्ट केली होती जी व्हायरल झाली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

तनुश्री दत्ताला सोमी अलीचा पाठिंबा
सोमी अलीने काही दिवसांपूर्वीच तनुश्री दत्ताचा जो व्हिडीओ समोर आला होता त्यानंतर तिला पाठिंबा दिला होता. तनुश्री जे सांगते आहे ते खरं आहे. तनुश्रीला खरोखर छळलं जात असणार त्याशिवाय ती असा व्हिडीओ करणार नाही. मी या सगळ्या प्रकारच्या जाचातून गेले आहे. असंही सोमीने म्हटलं होतं. त्यानंतर आता सोमीने आदित्य पांचोली आणि सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अली ही अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आहे. सलमानशी ब्रेक अप झाल्यावर तिने देश सोडला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती भारतात वास्तव्य करते आहे. सोमी अलीने याआधी सलमानवर काही आरोप केले होते.