अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘डबल एक्सएल’ (Double XL) या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासह हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक सतराम रमानी यांनी बॉडी शेमिंग या महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ती सायरा खन्ना या भूमिकेमध्ये दिसणार आहे. झहीर झक्बाल आणि महत राधवेंद्र यांनी या चित्रपटामध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
२०२१ मध्ये तिचा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मागील तीन-चार वर्षांमध्ये सोनाक्षीचे बरेचसे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाले. पण त्यातल्या फार कमी चित्रपटांना लोकांची पसंती मिळाली. ‘डबल एक्सएल’च्या निमित्ताने सोनाक्षी नव्या अवतारामध्ये दिसणार आहे. तिच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. प्रदर्शनाची तारीख जवळ आल्याने चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये गुंतलेली आहे. अशाच एका मुलाखतीमध्ये तिने बॉडी शेमिंग, सिनेसृष्टीमधील भेदभाव, ट्रोल्स अशा मुद्द्यांवर मत मांडले आहे.
आणखी वाचा – आजाराबद्दल कळताच चिरंजीवींनी समांथाला पाठवला खास निरोप; म्हणाले, “परिस्थितीशी झुंजणारी…”
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगते आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी प्रगती केली आहे. सध्या महिला प्रधान विषयांवरील चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाणही वाढले आहे. प्रेक्षक सुद्धा या चित्रपटांना प्रतिसाद देत आहेत. आपल्याकडे अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामध्ये खूप आधीपासून भेदभाव केला जातो. त्यांच्या मानधनामधील फरक हे याचे सर्वात प्रमुख उदाहरण आहे.”
ती पुढे म्हणाली, “त्यांच्या मानधनाच्या तुलनेमध्ये आम्हांला मिळणारे मानधन कमी असते हे सर्वश्रुत आहे. पुरुष असणं या एका गोष्टीमुळे त्यांना जास्त पैसे मिळतात. ते जे काम करतात, तेच काम आम्ही पण करतो. कधी-कधी तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतो. तरीही आम्हांला तुलनेने कमी पैसे दिले जातात. ही स्थिती बदलण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून होत आहेत. फक्त मनोरंजन विश्वच नाही, तर बऱ्याचशा ठिकाणी हा भेदभाव प्रकर्षाने जाणवतो.”