Sonu Nigam Song Removed After Appology : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा गायक सोनू निगम हा चांगलाच चर्चेत आहे. गायकाने त्याच्या बंगळुरू कॉन्सर्टमध्ये केलेल्या वक्तव्याने तो चर्चेत आला आहे. बंगळुरूत झालेल्या कॉन्सर्टमध्ये चाहता सोनूला कन्नड गाणं गाण्यासाठी आग्रह करत होता, यावरून सोनूने त्या चाहत्याच्या वागण्याची तुलना थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी केली. यानंतर सोनू निगमविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

हा वाद वाढल्याने सोनू निगमने अखेर माफीही मागितली आहे. “सॉरी कर्नाटक! तुमच्या लोकांवरील माझे प्रेम हे माझ्या अहंकारापेक्षा खूप मोठे आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो” असं म्हणत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. माफी मागूनही सोनू निगमला कन्नड लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. सोनूने एका कन्नड चित्रपटात गायलेलं गाणं काढून टाकण्यात आलं आहे आणि याबद्दल स्वत: निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आगामी कन्नड चित्रपट ‘कुलदल्ली केलीयावुदो’मधील सोनूचे गाणे काढून टाकण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका प्रेस नोटद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. निर्मात्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “सोनू निगम हा एक चांगला गायक आहे; यात काही शंका नाही. पण, त्याने अलीकडेच एका संगीत कार्यक्रमात कन्नड भाषेबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटलं. त्याने कन्नड भाषेचा केलेला अपमान आम्हाला सहन झाला नाही, म्हणून आम्ही गाणे काढून टाकले आहे.”

के रामनारायण दिग्दर्शित ‘कुलदल्ली केलीयावुदो’ चित्रपटासाठी सोनूने ‘मनसू हडताडे’ हे गाणे गायलं होतं. हे गाणं मनोमूर्ती यांनी संगीतबद्ध केलं असून योगराज भट यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. सोनूने गायलेलं हे गाणं निर्मात्यांनी चित्रपटातून काढून टाकले आहे. त्यामुळे आता नवीन गाणं कन्नडचाच गायक चेतन गाणार आहे. तसेच, चित्रपटाचे निर्माते संतोष कुमार यांनी सोनू निगमबरोबर भविष्यातील प्रोजेक्टसाठी काम न करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनू निगमकडे चाहत्याने जी मागणी केली होती, त्याची तुलना त्याने थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने काही संघटनांनी गायकाच्या असंवेदनशील वागण्याबद्दल आक्षेप घेतला होता. कर्नाटक रक्षण वेदिके (केआरव्ही) या प्रमुख कन्नड संघटनेने बेंगळुरूमध्ये पोलिसांत सोनू विरोधात तक्रार दाखल केली होती. यावर सोनूने पोस्ट शेअर करत माफी मागितली. या माफीनंतरही सोनू निगमचं कन्नड चित्रपटातील गाणं काढून टाकण्यात आलं आहे.