Sonu Sood Visits Flood Affected Villages In Punjab : बॉलीवूडमधील दानशूर आणि कायम मदतीला धावून येणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं नाव म्हणजे सोनू सूद. लॉकडाऊनच्या काळात आपले माणुसकीचे कार्य करून चर्चेत आलेले अभिनेते सोनू सूदने पुन्हा एकदा गरजूंसाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी तो पंजाबमधील पूरग्रस्त गावांना भेट देण्यासाठी पोहोचला आहे, याची खास झलक त्याने शेअर केली आहे.

सोनूच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो स्थानिक स्वयंसेवकांबरोबर बोटीवरून पूरग्रस्त भागात फिरताना दिसत आहे. सध्या गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाही, पंजाबमधील पूरग्रस्त गावकरी सोनूला प्रेमाने चहा, दूध आणि जेवण देत होते. ही अतिथीसेवा पाहून सोनू भावुक झाला.

सोनूने व्हिडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. या व्हिडीओत सर्वांना आवाहन करीत म्हणतो, “जे शेतकरी आपल्या देशाला अन्न देतात, त्यांच्या शेतातील पिकं पाण्याखाली गेले आहेत. पाणी कमी होईल, तशा त्यांच्या गरजा वाढत जातील. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात द्यायला हवा. ही आपल्या देशाच्या अन्नदात्यांप्रती आपली जबाबदारी आहे.”

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत तो म्हणतो, “आज सकाळपासून आम्ही अनेक गावांना भेट दिली. प्रत्येक घरी गेल्यावर लोक प्रेमाने चहा, दूध किंवा जेवण देत आहेत. जरा विचार करा, हेच शेतकरी आपल्याला अन्न पुरवतात. आज त्यांची शेतं पाण्याखाली आहेत. त्यांना आता आपली गरज आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत केली पाहिजे.”

सोनू सूद इन्स्टाग्राम व्हिडीओ

दरम्यान, सोनू सूद गेले काही दिवस पंजाबमध्ये आहे आणि तो प्रत्यक्ष मदत कार्य करत आहेत. त्याच्यासह रणदीप हुड्डा, सलमान खान, शाहरुख खान, दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा यांसारख्या अनेक कलाकारांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

हिंदू वृत्तपत्रानुसार, पंजाबमध्ये आलेल्या जोरदार पावसामुळे सतलज, रावी आणि बियास नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि पुर आला. यात काही लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेघरही झाले आहेत. सध्या पूरग्रस्तांना अन्न-सहाय्य देण्यात येत आहे.