Subhash Ghai Responds to Actress Allegations : ‘कर्ज’, ‘राम लखन’, ‘ताल’, ‘परदेस’ यांसारखे अनेक हिट चित्रपट देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक म्हणजे सुभाष घई. आपल्या दिग्दर्शनानं चर्चेत राहणारे सुभाष घई काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आहेत आणि ते म्हणजे एका अभिनेत्रीनं त्यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. नेहल वडोलिया या अभिनेत्रीने सुभाष घई यांनी तिला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
एका मुलाखतीत या अभिनेत्रीनं सांगितलं की, ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर सुभाष घई यांच्या घरी गेली होती. तेव्हा त्यांनी जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या दिसण्यावर अश्लील टिप्पण्या केल्या. सुभाष घई यांनी आता अभिनेत्रीच्या या आरोपांवर मौन सोडलं आहे. त्यांनी नवीन लोकांना भेटणं भीतीदायक असल्याचा संदर्भ असणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये सुभाष घई म्हणतात, “ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांकडे कोणी मदतीसाठी येत असेल, तर तरुणांना मार्गदर्शन करणं हे खरं तर त्यांचं कर्तव्यच आहे. पण, आजच्या काळात ओळख नसलेल्या लोकांना भेटणं धोकादायक वाटतं. कारण- काही जण केवळ प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर काहीही बोलतात. देव त्यांना सुबुद्धी देवो! एकमेकांप्रति आदर असणं हे करिअर घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे.”
नेहल वडोलिया या अभिनेत्रीनं Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिचा तेव्हाचा बॉयफ्रेंड सुभाष घई यांचा मॅनेजर होता. त्यानंच तिला दिग्दर्शकाच्या घरी नेलं; पण सुभाष घई यांचं वर्तन पाहून ती तिथून लगेच निघून गेली. त्यानंतर तिनं आपल्या बॉयफ्रेंडशीही संबंध तोडले. कारण- त्याला घई यांच्या वर्तनाची कल्पना असावी, असं तिला वाटलं.
सुभाष घई इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, सुभाष घई यांच्यावर हे असे आरोप होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. याआधी २०१८ मध्येही एका महिला अभिनेत्रीनं त्यांच्यावर जबरदस्तीने किस करण्याचा आणि परवानगीशिवाय स्पर्श केल्याचा आरोप केला होता. अशातच नेहलने त्यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान, या आरोपांनंतरच्या स्पष्टीकरणात सुभाष घई यांनी कुठेही अभिनेत्रीचं नाव घेतलेलं नाही; पण या पोस्टमधून त्यांनी आपली बाजू मांडली असल्याचं दिसत आहे.