Subhash Ghai on Rishi Kapoor: दिवगंत अभिनेते ऋषी कपूर ‘दीवाना’, हम दोनों, चांदनी, बडे घर की बेटी अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेते ऋषी कपूर ओळखले जातात.
ऋषी कपूर यांना ‘कर्ज’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजेल, असे वाटत होते. या चित्रपटाबद्दल त्यांना आशा वाटत होत्या. मात्र, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाल तेव्हा सुरुवातील या चित्रपटाने फारशी कमाई केली नव्हती. जेव्हा फिरोज खान यांचा कुर्बानी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर कर्ज या चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे कर्ज हा सिनेमा ‘सरासरी’ कमाई करणारा चित्रपट घोषित करण्यात आला.
सुभाष घई काय म्हणाले?
मात्र, गेल्या काही वर्षांत या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या चित्रपटात जे संगीत आहे, गाणी आहेत, त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. ऋषी कपूर यांनी या चित्रपटाची वाढती लोकप्रियता पाहिली होती. या वर्षी या चित्रपटाला ४५ वर्षे पूर्ण झाली. चित्रपटाच्या वर्धापनदिनाला मात्र ऋषी कपूर नसल्याने दिग्दर्शक सुभाष घई यांनी दु:ख व्यक्त केले.
सुभाष घई यांनी नुकतीच ‘रेडिओ नशा’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ऋषी कपूर यांचा स्वभाव संशयी होता, असे त्यांनी सांगितले. “या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. तेव्हा दर्द-ए-दिल, दर्द-ए-जिगर दिल में जगाया आपने या गाण्यासाठी कोणताही कोरिओग्राफर सेटवर उपस्थित नव्हता. त्यामुळे मी कोणाच्याही मदतीशिवाय त्या गाण्याचे कसे शूटिंग करणार, याची ऋषी कपूर यांना चिंता होती. पण, जेव्हा त्यांनी गाण्याचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पाहिले, तेव्हा त्यांना धक्का बसला. मला संगीताची जाण आहे, याचे त्यांना आश्चर्य वाटत होते”, असे घई म्हणाले.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऋषी कपूर यांची काय प्रतिक्रिया होती? यावर सुभाष घई म्हणाले, “त्यांनी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. त्यांना खात्री होती की, या चित्रपटाला खूप यश मिळेल. पण, या चित्रपटाबरोबरच कुर्बानी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि खूप हिट झाला. त्यामुळे आमच्या चित्रपटाला यश मिळण्यास थोडा वेळ लागला. पण, दरम्यानच्या काळात त्यांना वाटले की, चित्रपट फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे त्यांना इतके दु:ख झाले की, ते आजारी पडले. ते पाहिल्यानंतर त्यांचे वडील राज कपूर यांनी मला फोन केला आणि म्हणाले की, तुझ्या मित्राला समजावून सांग. चित्रपट चालतात किंवा चालत नाही. हा वेडा झाला आहे. पण, काही काळानंतर चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात कर्ज या चित्रपटाबाबत लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, कर्ज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी आत्मविश्वास गमावला आहे, असे वाटले. कर्ज या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मी विचार करत होतो की, कर्ज या चित्रपटामुळे माझ्या करिअरमध्ये मोठा बदल होईल. पण, घडले ते वेगळेच. संपूर्ण टीमने खूप मेहनत केली होती. मला वाटले होते की, खूप यश मिळेल; पण तसे घडले नाही. त्यामुळे मी हादरलो होतो.
दरम्यान, २०२० मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले.