Suniel Shetty on Sanjay Dutt: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये अनेक कलाकार हजेरी लावतात. या कार्यक्रमात कलाकारांच्या आयुष्यातील अनेक मजेशीर किस्से ऐकायला मिळतात.
बॉलीवूड अभिनेते संजय दत्त व सुनील शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोन्ही अभिनेत्यांनी त्यांचे अनेक किस्से सांगितले.
“सुनील दत्त यांच्या विरोधात…”
सुनील शेट्टीने सांगितलेला एक किस्सा लक्ष वेधून घेत आहे. सुनील शेट्टी म्हणाला, “संजय दत्तला राजकीय पक्षातील मित्राचा फोन आला. तो मित्र सुनील दत्त ज्या राजकीय पक्षात होते, त्या विरोधी पक्षातील होता. त्याने संजय दत्तला फोन करून सांगितले की निवडणुका आहे, त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी प्रचार करण्यासाठी या. ती व्यक्ती सुनील दत्त यांच्या विरोधात निवडणुकीसाठी उभी राहिली होती. संजयने त्याला होकार दिला.”
सुनील शेट्टीचे बोलणे ऐकूण संजय दत्त म्हणाला की मी विसरलो होतो. सुनील शेट्टी पुढे म्हणाला, “जेव्हा प्रचाराचा दिवस जवळ आला, त्यावेळी संजय दत्तच्या लक्षात आले की ही व्यक्ती तर माझ्याच वडिलांच्या विरोधात निवडणुकीत उभी राहिली आहे. त्यावेळी संजय दत्तने मला फोन केला आणि आण्णा मी ज्या ठिकाणी प्रचारासाठी जाणार होतो, तिथे माझ्याऐवजी तुम्ही जाणार आहात, असं मी कळवलं आहे. तर मी संजयला म्हणालो की मी प्रचारासाठी जातो.”
“प्रचार करून आल्यानंतर रात्री आमच्या दोघांचे जवळचे मित्र नितीन मनमोहनजी यांचा फोन आला. ते मला म्हणाले की, दत्त साहेब तुम्हाला बोलवत आहेत. मी विचारले की कोणता दत्त बोलवत आहे? त्यावर ते म्हणाले की सुनील दत्त बोलवत आहेत. मी म्हणालो की सुनील दत्त मला का बोलवत आहेत? त्यावर ते म्हणाले की, तुम्ही ज्या प्रचारासाठी गेला होता, ते त्यांच्या विरोधात होते.”
“दत्त साहेबांनी मला घरी बोलावले आणि मला ते म्हणाले की मी समजू शकतो तुम्ही मित्र आहात, पण माझ्याविषयीसुद्धा विचार करायला पाहिजे होता. मी मनातल्या मनात विचार करत होतो की तुमच्या मुलाने तुमचा विचार केला नाही, मी कसा करणार?”
सुनील शेट्टीने हा किस्सा सांगितल्यानंतर प्रेक्षकांसह संजय दत्त, कपिल शर्मा, अर्चना पूरन सिंंह आणि स्वत: सुनील शेट्टीदेखील मोठ्याने हसताना दिसले. दरम्यान, संजय दत्त व सुनील शेट्टी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसले होते.