वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या गोविंदाने १९८६ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि १९८७ मध्ये त्याने सुनीताशी लग्न केलं होतं. करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून गोविंदाने लग्न लपवून ठेवलं होतं. लग्नानंतर वर्षभराने सुनीता आई झाली. तिच्या मुलीचं नाव टीना आहुजा आहे. टीनाच्या जन्मानंतर ८ वर्षांनी त्यांना दुसरा मुलगा झाला. त्यांच्या मुलाचे नाव यशवर्धन आहे.

एका मुलाखतीत सुनीताने तिच्या मुलाच्या जन्माची आठवण सांगितली. गोविंदाला मुलासाठी रडताना पाहून सुनीताने डॉक्टरांना तिच्याऐवजी तिच्या मुलाला वाचवण्यास सांगितलं होतं.

ईट ट्रॅव्हल रिपीट या युट्यूब चॅनलशी बोलताना सुनीताने मुलाच्या जन्मावेळचा कठीण दिवस आठवला. “जेव्हा मी माझ्या मुलाला, यशला जन्म देत होते तेव्हा माझे वजन १०० किलो होते. माझे वजन खूप वाढले होते. मला वाटलं होतं की मी मरेन. माझ्याकडे पाहून गोविंदा रडू लागली. त्या काळात गर्भलिंग निदान चाचणी कायदेशीर होती. त्यामुळे आम्हाला मुलगा होणार आहे हे आम्हाला माहीत होतं. मी डॉक्टरांना सांगितलं, ‘डॉक्टर, माझ्या पतीला मुलगा हवा आहे. प्लीज माझ्या मुलाला वाचवा, मी मेले तरी चालेल.’ मी असं बोलल्यावर गोविंदा आणखी रडू लागला. तो खूप रडत होता. आमच्या सर्वांसाठी हा फिल्मी क्षण होता,” असं सुनीता म्हणाली.

हॉटरफ्लायने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, सुनीता आहुजाने वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या हे जोडपे कोर्टाने बंधनकारक केलेल्या काउन्सेलिंगच्या प्रक्रियेतून जात आहे. दुसरीकडे, गोविंदाचे वकील ललित बिंद्रा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये पूर्वी बिनसलं होतं, पण त्यांनी चर्चा करून सगळे वाद मिटवले आणि ते पुन्हा एकत्र आले आहेत.

सुनीताने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये गोविंदा फसवणूक करतोय, अशा प्रकारची वक्तव्ये केली होती. इतकंच नाही तर गोविंदा वेगळा राहतो आणि सुनीता मुलांबरोबर वेगळी राहतेय. मागील १२ वर्षांपासून तिच्या वाढदिवसाला गोविंदा येत नाही, असंही तिने नमूद केलं होतं. यावर्षी सुनीता मुलगा यशबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आली होती. तेव्हा तिला गोविंदाबद्दल विचारण्यात आलं होतं. “गोविंदा त्याच्या व्हॅलेंटाईनसोबत गेला आहे,” असं उत्तर सुनीताने दिलं होतं. त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा वेगाने पसरू लागल्या.

दरम्यान, पुन्हा एकदा गोविंदा व सुनीताच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत, पण दोघांनी यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.