Karisma Kapur ex Husband Sunjay Kapur Last Words : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती व उद्योजक संजय कपूर यांचं निधन झालं. १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. संजय कपूर मधमाशी गिळले होते, त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. संजय कपूर ५३ वर्षांचे होते. संजय कपूर यांचं निधन झालं तेव्हा त्यांचे शेवटचे शब्द काय होते? याबद्दल माहिती समोर आली आहे.
इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना संजय कपूर यांच्या तोंडात मधमाशी शिरली. ती मधमाशी त्यांच्या घशात अडकली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. संजय यांचं निधन झालं तेव्हा तिथे बरेच लोक उपस्थित होते. निधनाआधी संजय कपूर काय म्हणाले होते, ते त्या लोकांनी सांगितलंय. यासंदर्भात टेलिकग्राफने वृत्त दिलंय.
संजय यांच्या बिझेनस पार्टनरने दिली माहिती
“मी काहीतरी गिळलंय”, असं संजय मृत्यूआधी म्हणाले होते. संजय यांचे मित्र व बिझनेस पार्टनर सुहेल सेठ यांनी या घटनेबद्दल एनएनआयशी बोलताना माहिती दिली. “संजयचे निधन हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाले. ते इंग्लंडमध्ये पोलो मॅच खेळत असताना त्यांच्या घशात मधमाशी अडकली,” असं सेठ म्हणाले होते.
“संजय यांच्या जाण्याने फक्त त्यांचे कुटुंबीय व मित्रांचेच नाही तर क्लबचेही मोठे नुकसान झाले आहे. क्लबच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांची आठवण येत राहील. त्यांनी खूप लोकांना रोजगार दिला होता. ते खूप दयाळी व मोठ्या मनाचे होते. त्यांनी खूप सारे मित्र बनवले,” असं संजय कपूर यांच्या एका मित्राने म्हटलंय.
दिल्लीत होणार अंत्यसंस्कार
संजय कपूर यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार केले जातील. परंतु अमेरिकेतून त्यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब होऊ शकतो. संजय कपूर यांचे सासरे अशोक सचदेव यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की, लंडनमध्ये संजय कपूर यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह भारतात आणला जाईल.
कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक होते संजय कपूर
संजय कपूर यांची एकूण संपत्ती अंदाजे १.२ बिलियन डॉलर्स म्हणजे १०,३०० कोटी रुपये आहे. संजय कपूर सोना कॉमस्टारचे चेअरमन होते. या कंपनीची स्थापना १९९५ मध्ये संजयचे वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती.
संजय कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी ३ लग्नं केली. त्यांचं पहिलं लग्न नंदिताशी झालं होतं, त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर संजय यांनी अभिनेत्री करिश्मा कपूरशी दुसरं लग्न केलं. ११ वर्षांनंतर करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि ते विभक्त झाले. संजय व करिश्माला समायरा व कियान ही दोन मुलं आहेत. करिश्मापासून घटस्फोट झाल्यावर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगा आहे.