Sunjay Kapur Plan for Family : उद्योजक व करिश्मा कपूर यांचे एक्स पती संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी लंडनमध्ये निधन झाले. १९ जून रोजी दिल्लीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंब आणि जवळच्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी शिरली आणि त्यांच्या श्वासनलिकेत अडकली. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
संजय कपूर हे सोना कॉमस्टारचे चेअरमन होते. यशस्वी उद्योजक असलेल्या संजय यांनी त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बऱ्याच गोष्टी प्लॅन करून ठेवल्या होत्या. त्यांनी मुलांच्या भविष्याचा जवळपास १० वर्षांचा प्लॅन आखला होता. त्यांचे कुटुंब नेहमी एकत्र राहावे आणि त्यांच्या मुलांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत अशी त्यांची इच्छा होती.
संजय कपूर यांना दुसरी पत्नी करिश्मा कपूरपासून समायरा व कियान ही दोन मुलं आहेत. तर तिसऱ्या पत्नीपासून एक मुलगा झाला. तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिला पहिल्या लग्नापासून सफिरा नावाची मुलगी आहे, तीही संजय कपूर यांच्या कुटुंबाबरोबर राहते. संजय यांनी मुलांच्या भविष्यासाठी १० वर्षांचा प्लॅन तयार करून ठेवला होता. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या चार मुलांनी कोणत्या तत्त्वांनुसार जगावं, याबद्दल त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या मृत्यूच्या फक्त तीन महिन्यांपूर्वीच्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संमिश्र कुटुंबाने त्यांच्या निधनानंतरही एकमेकांबरोबर प्रेमाने राहावं अशी इच्छा व्यक्त केली होती.
चांगले पालक होण्यासाठी संजय-प्रिया घ्यायचे सेशन
संजय कपूर यांनी इंडियन सिलिकॉन व्हॅली पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी संजय कोणत्या तत्वांनुसार आयुष्य जगतात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. “माझ्यासाठी विश्वास आणि आदर या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कुटुंबाने एकत्र प्रेमाने राहावं. मी आणि माझी पत्नी पालकत्वाबद्दल कोचिंग सेशन घेतो, कारण आम्हाला चांगले आई-वडील व्हायचं आहे. आम्ही आठवड्यातून एकदा भगवद्गीतेवर कोचिंग सेशन घेतोय. मला वाटतं की माझ्या मुलांनी व माझ्या कुटुंबाने विश्वास, आदर, एकता, एकत्र राहणं या काही मूल्यांवर आधारित आयुष्य जगायला हवं. कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे,” असं संजय कपूर म्हणाले होते.
मी गेल्यानंतरही सगळं असंच चालू राहावं – संजय कपूर
“आमचं कुटुंब खूप वेगळं आहे, त्यामुळे त्यांनी एकत्र प्रेमाने राहणं इतकं सोपं नाही. मात्र, आम्ही खूप नशीबवान आहोत की आमच्याकडे अशी व्यवस्था आहे जिथे एकत्र मिळून काही गोष्टी करता येतात. आम्ही प्रेमाने राहू शकतो. मी आणि माझी पत्नी गेल्यानंतरही हे असेच चालू राहावे अशी माझी इच्छा आहे,” अशी इच्छा संजय कपूर यांनी व्यक्त केली होती.
संजय कपूर यांचा १० वर्षांचा प्लॅन
कंपनीतील पदावरून पायउतार झाल्यावर कसं आयुष्य जगायचंय, तेही संजय कपूर यांनी सांगितलं होतं. “मी एक उत्तम प्लॅनर आहे. ऑक्टोबरमध्ये मी स्वतःसाठी १० वर्षांचा आराखडा लिहिला; त्यात फक्त लक्ष्य नाही, तर ज्या गोष्टींवर मी लक्ष केंद्रित करेन त्याचाही समावेश होता. मग ती कामाशी संबंधित असो किंवा इतर असतो. कामापलिकडे माझ्याकडे खूप कमिटमेंट्स आहेत. मी काय करेन आणि काय करणार नाही याबद्दल मी खूप स्पष्ट आहे. खेळ माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, आरोग्य आणि तंदुरुस्ती माझ्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मी पोलो खेळतो, माझी एक टीम आहे. पण माझ्या कुटुंबाबद्दलही माझी जबाबदारी आहे. जेव्हा मी माझी १० वर्षांची योजना आखली, तेव्हा मी काम आणि इतर गोष्टींची व्यापक रूपरेषा लिहिली. मी काय करेन हे ठरवण्यासाठी मी यातून २०२५ हे वर्ष वगळले. मी कोणत्याही वेळापत्रकाशिवाय बसू शकत नाही. तुमच्या वेळेचे तुम्ही मालक आहात ही एक मोठी लक्झरी आहे,” असं संजय कपूर म्हणाले होते.
दरम्यान, संजय कपूर हे देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक होते. त्यांची एकूण संपत्ती तब्बल १०,३०० कोटी रुपये आहे.