उद्योगपती संजय कपूरची तिसरी प्रिया सचदेव आणि त्यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यात ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेसंदर्भात वाद सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान प्रियाने करिश्मावर टीका केली. संजयने काही वर्षांपूर्वीच करिश्माला सोडून दिलं, असंही प्रिया म्हणाली.

करिश्माच्या मुलांनी प्रियावर बनावट मृत्युपत्र तयार करून त्यांना वारसाहक्कातून वगळल्याचा आरोप केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी समायरा आणि कियान यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. आता करिश्माला प्रिया सचदेवने कोर्टात उत्तर दिलं आहे.

सुनावणीदरम्यान प्रियाने तिचे वकील राजीव नय्यर यांच्यामार्फत करिश्माला उत्तर दिलं. गेली १५ वर्षे संजयच्या आयुष्यात नव्हतीस, पण त्याच्या निधनानंतर अचानक त्याच्या आयुष्यात परत आलीस असा आरोप प्रियाने करिश्मावर केला. प्रियाच्या टीमने ती संजयची कायदेशीररित्या विवाहित पत्नी असण्यावर भर दिला.

प्रियाचे करिश्माला उत्तर

“ती त्यांची कायदेशीर पत्नी आहे. आता प्रेम आणि आपुलकी आठवतेय ती सर्वोच्च न्यायालयात घटस्फोटासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढताना कुठे होती,” असं राजीव न्यायालयात करिश्माला म्हणाले.

priya sachdev sunjay kapur
मुलांबरोबर प्रिया सचदेव व संजय कपूर (फोटो- इन्स्टाग्राम)

“तुमच्या नवऱ्याने तुम्हाला काही वर्षांपूर्वी सोडलं. तुम्ही मागील १५ वर्षे त्यांच्या आयुष्यात नव्हत्या,” असंही राजीव यांनी कोर्टात नमूद केलं. दरम्यान, करिश्माने घटस्फोट घेताना संजयवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.

करिश्माच्या मुलांची कोर्टात धाव

मंगळवारी करिश्मा व संजयच्या मुलांनी, समायरा कपूर (२०) आणि कियान कपूर (१५) यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

वडिलांनी संपत्तीत वाटा देण्याचं आश्वासन दिलं होतं, असा दावा दोघांनी याचिकेत केला आहे. पण मृत्युपत्रात त्याचा उल्लेख नाही. मुलांनी त्यांची सावत्र आई, संजयची तिसरी पत्नी, प्रिया सचदेव कपूरवर मृत्युपत्र बदलल्याचा आरोप केला आहे. करिश्मा या प्रकरणात तिच्या मुलांचे प्रतिनिधित्व करत आहे. न्यायालयाने आता प्रियाला संजय कपूरच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची यादी सादर करण्यास सांगितलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

करिश्मा व संजय यांचा १३ वर्षांचा संसार

२००३ मध्ये संजय कपूर व करिश्मा कपूरचे लग्न झाले होते. ते २०१६ पर्यंत एकत्र होते. त्यांना समायरा व कियान ही दोन अपत्ये आहेत. करिश्माशी घटस्फोट झाल्यानंतर २०१७ मध्ये संजयने प्रिया सचदेवशी लग्न केले. संजय याचं जून २०२५ मध्ये लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. संजय कपूर यांची मालमत्ता ३०,००० कोटी रुपये आहे.