बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे जून महिन्यात निधन झाले. देशातील आघाडीचे उद्योगपती असलेले संजय कपूर हे सोना कॉमस्टारचे चेअरमन होते. संजयच्या निधनानंतर बिझनेससंदर्भात कपूर कुटुंबात वाद सुरू झाले आहेत. संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवने त्यांच्या आईला जबरदस्ती कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावली, असा दावा संजयची बहीण मंधीराने केला आहे.
रिपब्लिकला दिलेल्या मुलाखतीत, मंधीराने तिच्या घरात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबद्दल सांगितलं. प्रियाने कंपनीचा पदभार स्वीकारल्यापासून १३ दिवसांत आईला काही कागदपत्रांवर सही करायला भाग पडलं. हे सर्व तिने बंद दाराआड केलं. दोनदा असं घडलंय. मी दार ठोठावत होते आणि दुःखी होते, असं मंधीरा म्हणाली.
प्रिया सचदेववर मंधीराने केले आरोप
मंधीरा पुढे म्हणाली, “तिथे दोन दरवाजे होते. एक आत आणि एक बाहेर. आईला माझा आवाज ऐकू येत नव्हता. प्रियाने शोकसभेत आईला सांगितलं की तिला काही कागदपत्रांवर सही करावी लागेल.” मंधीराच्या मते तिची आई मुलाच्या निधनामुळे प्रचंड दुःखात होती. ती मंधीराला म्हणाली, “‘मला माहित नाही की मी कोणत्या कागदपत्रांवर सही केली आहे.’ आणि तेव्हापासून आम्ही तिला विचारत आहोत पण आम्हाला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. तू आमच्यापासून काय लपवत आहेस? असं आम्ही विचारतोय, पण ती सांगत नाही. मला वाटतं की हे सर्व कधीतरी बाहेर येईल आणि सत्य सर्वांसमोर येईल.”
कागदपत्रे अजून पाठवली नाहीत
मंधीरा म्हणाली, “माझ्या आईने कागदपत्रे पाहण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रियाने आश्वासन दिलं होतं की ती कागदपत्रे पाठवेल पण आम्हाला अद्याप ती कागदपत्रे मिळालेली नाहीत. प्रियाचा ईमेल हॅक झाला आहे आणि ते त्यांना काहीही पाठवू शकत नाहीत असं ते सांगत आहेत.”
दरम्यान, संजय कपूर यांच्या निधनानंतर काही दिवसांनी प्रियाला सोना कॉमस्टारची नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.
मंधीराने केलेलं करिश्माचं कौतुक
“करिश्मा कपूर एक आई आहे. ती खूप चांगली आई आहे. तिचे कुटुंब एकत्र राहावे, यासाठी तिने खूप प्रयत्न केले आहेत. मुलांचे आणि संजयचे बॉण्डिंग खूप चांगले होते. त्यांचे नाते उत्तम होते. मी आशा करते की, पुढेही मुलांबरोबरचे आमचे नाते तसेच राहावे, संपूर्ण कुटुंब एकत्र असावे. कुठल्याही आईला तिच्या मुलांची काळजी असते, तिलाही तिच्या मुलांची काळजी आहे आणि ती तेच करत आहे,” असं मंधीरा करिश्माबद्दल म्हणाली होती.