Sunjay Kapur’s sister Mandhira Kapur stands with mother: करिश्माचा एक्स पती उद्योगपती संजय कपूरचे १२ जूनला लंडनमध्ये निधन झाले. त्याच्या निधनानंतर संजय कपूरच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद सुरू आहे.

संजय कपूरच्या निधनानंतर त्याची पत्नी प्रिया सचदेवची सोना कॉमस्टार या ऑटो कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सगळ्यात संजय कपूरचे निधन संशयास्पद असल्याचे त्याच्या आईने म्हटले होते.

तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीच्या वार्षिक मीटिंगपूर्वी संचालक मंडळाला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला होता की, त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. तसेच काही व्यक्ती कुटुंबाचा वारसा सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी कुणाचीही नियुक्ती केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंधीरा कपूर काय म्हणाली?

आता संजय कपूरची बहीण मंधीरा कपूरने रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आई राणी आणि भाऊ संजय यांच्याबरोबर दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, “तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मी पुन्हा अनुभवत आहे. आता मी तुला जे हवं होतं आणि बाबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, त्याचं संरक्षण करत आहे. जर तू आज असतास, तर गोष्टी वेगळ्या असत्या. परिस्थिती अजून चांगली असती”, असे लिहीत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने असेही लिहिले की आई रडत असताना मी स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रक्षाबंधनच्या वेळी तुझ्या फोटोच्या एका कोपऱ्याला राखी बांधली.

संजय कपूरच्या निधनानंतर मंधीरा कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिने त्यांच्यात चार वर्षे अबोला असल्याचे म्हटले होते. तिने असेही लिहिले होते की, जरी आता आमच्यात मतभेद असतील तरीही माझी खात्री आहे की, माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं, हे त्याला माहीत होतं.

संजय कपूरच्या निधनानंतर कंपनीच्या बोर्डाने २३ जून २०२५ रोजी जेफ्री मार्क ओव्हरली यांची अध्यक्षपदी एकमताने नियुक्ती केली. तसेच, संजय कपूरच्या आईने नाव न घेता, काही जण कुटुंबाचा वारसदार होण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. जरी राणी यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख प्रिया सचदेवकडे आहे, असे म्हटले जाते.

दरम्यान, संपत्तीचा वाद सुरू असतानाच प्रिया सचदेवने तिच्या नावात काही बदल केले आहेत. सोशल मीडियावर पूर्वी प्रिया सचदेव-कपूर, असे नाव तिने लिहिले होते; तर आता तिने प्रिया संजय कपूर, असे लिहिल्याचे दिसत आहे. तसेच ती सोना कॉमस्टर कंपनीची नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असल्याचेदेखील तिने लिहिले आहे.