सध्या ‘गदर २’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच‘गदर २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. दोन दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’चा सीक्वेल ‘गदर २’ चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
मूव्हीमॅक्सवर या चित्रपटाची आतापर्यंत १ हजार ९८५ तिकिटे विकली गेली आहेत. तर मिरज चित्रपटगृहात आतापर्यंत २ हजार ५०० तिकिटे विकली गेली आहेत. त्याचबरोबर सिनेपोलिसने आतापर्यंत या चित्रपटाची ३ हजार ९०० ॲडव्हान्स तिकिटे विकली आहेत. पीव्हीआर आणि आयनॉक्सने अद्याप या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग अद्याप सुरू केलेली नाही.
चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहून दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या या भरघोस प्रतिसादासाठी आभारही मानले आहेत.
‘गदर २’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट पहिल्या दिवशी २० कोटींची कमाई करू शकतो. दुसरीकडे, काही लोकांच्या मते, हा चित्रपट पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई देखील करू शकतो. पठाणनंतर हा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरू शकतो, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, ‘गदर २’ मध्ये सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिम्रत कौर, लव्ह सिन्हा, गौरव चोप्रा, मिर सरवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. रोहित चौधरी आणि मनीष वाधवा यांनी ‘गदर २’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.