Sunny Deol and Bobby Deol share rare photos with mother: बॉलीवूडचे देओल कुटुंब हे कायमच चर्चेत असते. अनेकदा चित्रपटांमुळे, तर काही वेळा खासगी आयुष्यामुळेदेखील या कुटुंबाची चर्चा होत असते. सनी देओल, बॉबी देओल यांच्याप्रमाणेच धर्मेंद्रदेखील सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतात.
सनी देओल, बॉबी देओल यांची आईसाठी खास पोस्ट
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सनी देओल व बॉबी देओल यांनी काही खास पोस्ट शेअर केल्या आहेत. तसेच आतापर्यंत न पाहिलेले काही फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत.
सनी देओलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो व आई प्रकाश कौर दिसत आहे. दोघेही कॅमेऱ्यासाठी आनंदाने पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये प्रकाश कौर यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान आहे; तर सनीने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करीत त्याने लिहिले, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” सनी देओलच्या पोस्टवर त्याच्या मुलांनीदेखील त्यांच्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर, धर्मेंद्र व प्रकाश कौर यांचा लहान मुलगा बॉबी देओलने आईबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या आईला मिठी मारल्याचे पाहायला मिळत आहे. तर ,दुसऱ्या फोटोमध्ये बॉबी व सनी देओल त्यांच्या आईबरोबर सेल्फी घेताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले, आई लव्ह यू, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! पुढे त्याने हार्ट इमोजीदेखील शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. या अभिनेत्यांच्या पोस्टवर चाहत्यांनीदेखील प्रकाश कौर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या वर्षी एप्रिलमध्ये बॉबी देओलने वडील धर्मेंद्र आणि आई प्रकाश कौर यांच्या त्याच्यावर असलेल्या प्रभावाबद्दल वक्तव्य केले होते. ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणालेला की, आज मी जो कोणी आहे, तो माझ्या आई-वडिलांमुळे आहे. माझ्या आईमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला आहे.
सनी देओलनेदेखील मातृदिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर करीत कृतज्ञता व्यक्त केली होती. त्याने लिहिलेले की, आई तू, मला कधीही काहीही न मागता सर्व काही दिलेस. तुझे प्रेम ही माझ्यासाठी सर्वांत मोठी भेट आहे.
दरम्यान, धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना विजयता आणि अजीता अशा दोन मुलीही आहेत. त्या अमेरिकेत राहतात. धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले होते. त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल अशा दोन मुली आहेत.