Dharmendra Health Update : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या रुग्णालयात दाखल आहेत. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना वयोमानानुसार त्रास होत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धर्मेंद्र लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली असून ते व्हेंटिलेटरवर आहेत, अशा बातम्या येत आहेत. आता सनी देओलच्या जवळच्या व्यक्तीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. व्हायरल रिपोर्ट्सनुसार त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सनी देओलच्या जवळच्या व्यक्तीने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे.
सनी देओलच्या जवळच्या व्यक्तीने काय सांगितलं?
“धर्मेंद्र व्हेंटिलेटर असल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. धरमजी गेल्या एका आठवड्यापासून रुग्णालयात आहेत. जर ते व्हेंटिलेटरवर असते की प्रकृती बिघडली असती तर संपूर्ण देओल कुटुंब रुग्णालयात असते. सनी देओल आज सकाळीच त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते,” अशी माहिती सनी देओलच्या जवळच्या व्यक्तीने स्क्रीनशी बोलताना दिली.
दरम्यान, आता धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्याबरोबर राहत नाहीत. ते त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याबरोबर खंडाळा येथील फार्म हाऊसमध्ये राहतात. त्यांचं वय झालंय, त्यामुळे ते तिथे राहतात. तिथलं वातावरण, शुद्ध हवा त्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे, असं बॉबी देओलने एका मुलाखतीत
सांगितलं होतं.
धर्मेंद्र सध्या रुग्णालयात आहेत, पण त्यांच्या ‘इक्कीस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये त्यांची दमदार भूमिका आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर सिमर भाटिया बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत, सिकंदर खेर, विवान शाह, राहुल देव, आर्यन पुष्कर, प्रगती आनंद हे कलाकार आहेत.
