बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून, जागतिक पातळीवर देशाची मान उंचावली होती. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकून इतिहास रचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर ती घराघरात ओळखली जाऊ लागली. सुश्मिताने केवळ ‘मिस युनिव्हर्स’ हा जगप्रसिद्ध किताबच जिंकला नाही, तर त्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर कामही केलं. त्याबद्दल तिनं मिड-डेला मुलाखतही दिली होती.
२०१० ते २०१२ या काळात मिस इंडिया युनिव्हर्सची फ्रँचायजी तिनं हाताळली. त्याबद्दल ती म्हणते, “मिस युनिव्हर्स ऑर्गनायजेशनकडून मला कॉल आला आणि विचारलं, ‘तुला फ्रँचायजी घ्यायची आहे का?’ तेव्हा मला वाटलं, खरंच? हे तर स्वप्नासारखं आहे. तेव्हा मी खूपच कठीण अटी असलेला करार केला होता. त्या वेळी ही फ्रँचायजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीची होती, त्यामुळे हे काम आनंद देणारं किंवा सोपं नव्हतं.”
“त्या काळात Paramount Communication आणि Madison Square Garden हे माझे खरे बॉस होते. कारण- त्यांनीच मिस युनिव्हर्स विकत घेतली होती. मी फक्त ट्रम्पकडून फ्रँचायजी घेतली होती. ती पुढे सांगते की, ट्रम्पशी तिची भेट झाली होती; कारण- त्यांच्या फ्रँचायजीशी संबंध होता. मात्र, त्यांच्याविषयी अधिक बोलायला तिनं नकार दिला होता. त्याबद्दल ती म्हणाली होती, “खरं सांगायचं तर त्याचं काही विशेष नाही. काही लोक असतात, जे त्यांच्या सामर्थ्यामुळे नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे लक्षात राहतात. डोनाल्ड ट्रम्प हे त्यातले नाहीत.”
२०१० मध्ये सुश्मिता सेनने ‘I Am She’ या नावाने फ्रँचायजी सुरू केली. पहिल्या वर्षी तिनं ३०, तर त्याच्या पुढच्या दोन वर्षांत प्रत्येकी २५ मुलींना प्रशिक्षण दिलं. भारतीय मुलींना तयार करून, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाठवणं तिला खूप आवडायचं. पण, २०१२ मध्ये तिनं फ्रँचायजी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामागचं कारण तिनं सांगितलं होतं, “मुलींना प्रशिक्षण देणं खूप प्रेरणादायक होतं; पण मी ज्या लोकांबरोबर काम करत होते, त्यांच्या वागणुकीबद्दल मी समाधानी नव्हते.”
सुश्मिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं १९९६ मध्ये महेश भट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे तिनं ‘बीवी नंबर १’ या विनोदी चित्रपटात सलमान खानबरोबर काम केलं. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर तिने ‘सिर्फ तुम’, ‘मैने प्यार क्यूं किया’, ‘मैं हूं ना’सारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
२०२० मध्ये सुश्मिता ‘आर्या’ या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली. तिच्या या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. तर २०२३ मध्ये ‘ताली’ या सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यात तिनं श्रीगौरी सावंत यांची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक झालं होतं.