Swara Bhaskar on weight gain after pregnancy: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. सडेतोड, स्पष्ट वक्तव्यांसाठी ती ओळखली जाते. तिच्या काही ट्विट्समुळे ती अनेकदा ट्रोलदेखील होते.

आता स्वरा भास्करचे आणखी एक वक्तव्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. बाळाच्या जन्मानंतर तिचे वजन वाढले आहे. यावर तिने वक्तव्य केले. तसेच, अनेक अभिनेत्री, तसेच अनेक इतर महिलादेखील गरोदरपणानंतर लगेच पुन्हा वजन कमी करण्यावर भर देतात. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यावरही वक्तव्य केले आहे.

“मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग…”

स्वरा भास्करने नुकतीच तिच्या पतीसह ‘फिल्मीग्यान’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा ट्रोल केले जाते यावर तिने तिचे मत मांडले. गरोदरपणानंतर तिचे वजन वाढल्यानंतरही तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले, असेही स्वरा म्हणाली. ती म्हणाली, “गरोदरपणानंतर वजन वाढले. त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केले गेले. आताही करतात. आता मला फरक पडत नाही.”

“सुरुवातीला बाळाच्या जन्मानंतर तुम्ही खूप संवेदनशील असता. मानसिक स्थितीसुद्धा थोडी कमजोर असते. प्रत्येक गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यादरम्यानच्या काळात जे ट्रोलिंग केले जात होते. त्यावेळी मला वाईट वाटायचे. मला कळायचंच नाही की लोक त्यावरुन का ट्रोल करत आहेत. कारण- गरोदरपणानंतर वजन वाढणे ही सामान्य गोष्ट आहे.”

अभिनेत्री पुढे असेही म्हणाली, “आता मला समजले आहे की मूर्ख लोकांचे तु्म्ही काहीही करू शकत नाही. ज्याच्या डोक्यात कचरा आहे, तो व्यक्ती सर्वांना कचराच दाखवणार आहे.”

याच मुलाखतीत तिला विचारले की कलाकार म्हणून वजन कमी करणे, याचा तुमच्यावर दबाव असतो का? यावर स्वरा म्हणाली, “तुम्ही जर अभिनेत्री असाल तर हा खूप दबाव असतो की तुम्ही आधी जसे दिसत होता, तसेच तुम्ही दिसायला हवे. मला वाटते की ज्या अभिनेत्री पुन्हा वजन कमी करु शकतात, बाळाच्या जन्माआधी त्या जशा दिसायच्या तशा दिसू शकतात. तर त्याला असे दाखवले जाते की खूप मोठे काहीतरी त्यांनी काम केले आहे. ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण, मला वाटते की प्रत्येकाच्या हा निवडीचा अधिकार आहे.”

स्वरा पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही आई होता, त्यावेळी तुमचे आयुष्य बदलते. तुम्ही कायमसाठी पालक होता. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आमची मुलगी आमची असणार आहे. असं म्हणतात की एक बाळ आईला जन्म देते. हे खरं आहे. मी हे अनुभवलं आहे. मी जेव्हा पालक नव्हते, आई नव्हते, त्यावेळी मी एक वेगळी व्यक्ती होते. आता आई झाल्यानंतर मी एक वेगळी व्यक्ती आहे. आपले दिसणेच बदलत नाही तर आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो.”

“मला एक बाळ आहे आणि मला बाळ नाही, असे दिसण्याची माझी अजिबात इच्छा नाही. तुम्हाला बाळ झाल्यानंतरही तुम्हाला २५ वर्षाचे दिसायचे असते, ही कल्पना, हा विचार मला पटत नाही. मी २५ वर्षांची नाही. मी वयाची ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. मला बाळ आहे. मला २५ वर्षांची असल्यासारखे दिसण्याची गरज वाटत नाही.

गेल्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर पती फहाद अहमदबरोबर कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये सहभागी झाली आहेत. या शोमध्ये स्वरा व फहादसह रुबिना दिलैक व पती अभिनव शुक्ला, हिना खान व रॉकी जैस्वाल, देबीना बॅनर्जी व गुरमित चौधरी, अविका गौर आणि मिलिंद चंदवानी, ममता व सुदेश लहरी अशी काही सेलिब्रिटी जोडपी पाहायला मिळत आहेत.