तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. तापसी पन्नू ही सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. सूरमा, मुल्क आणि मनमर्जिया यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात तापसी झळकली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तापसी ही कायमच पापाराझींबरोबर वाद घालतानाचे व्हिडीओ समोर येत आहे. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकतंच तापसीने ती पापाराझींबरोबर अशी का वागते? याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे.
तापसी पन्नूने ‘नवभारत टाईम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला पापाराझींबरोबर तिचे वाद होण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने फार सविस्तरपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : नववीत प्रेम, काही महिन्यातच ब्रेकअप, तापसीने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा
“मी गेल्या दहा वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. मी ज्या मीडिया प्रतिनिधींना समोरासमोर भेटते त्यांना माझे व्यक्तिमत्त्व चांगलेच माहिती आहे. मी फक्त चित्रपटासाठी कॅमेरासमोर अभिनय करते. माझी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य अजिबात वेगवेगळे नाही.
पण जेव्हा मी घराच्या बाहेर पडते तेव्हा पापाराझींनी माझे फोटो काढू नये, अशी माझी इच्छा असते आणि जरी ते तसं करत असतील तरी त्यांनी थोडं आदरपूर्वक ते करायला हवं. मी तुमचा आदर करेन, तुम्हीही माझा आदर करावा अशीच माझी अपेक्षा असते. मी एक अभिनेत्री असली तरीही तुम्हाला माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही”, असे ती म्हणाली.
“अनेकदा असे घडतं की मी काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नसते. त्यामुळे मी बाहेर पडून थेट गाडीत जाऊन बसते. पण काही पापाराझी हे माझ्या गाडीचा खिडकीसमोर कॅमेरा धरुन एखादा व्हिडीओ शूट करतात. तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. यावर लाखो लाइक्स आणि कमेंट्सही असतात. पण हे मला अजिबात आवडत नाही.
मी कोणत्याही बॉडीगार्डशिवाय रस्त्यावर फिरते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या या गोष्टीचा गैरफायदा घ्याल. एक अभिनेत्री सोडा तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीबरोबर असे करु शकत नाही. त्यामुळे जर भविष्यात माझ्या बॉडीगार्डने तुम्हाला धक्का मारु नये, असे वाटत असेल तर माझ्याशी आदराने वागा.
अनेकदा अभिनेत्री असण्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. सर्वसामान्यांपेक्षा खूप वाईट गोष्टींचा सामना आम्हाला करावा लागतो. मी एखाद्या प्राणीसंग्रहालयातील प्राणी आहे का? की तुम्ही कॅमेरा घेऊन माझ्या मागे येत आहात आणि मी तुमचे मनोरंजन करेन”, असे तापसीने म्हटले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तापसीचा आगामी ‘ब्लर’ हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. याबरोबरच तापसी ही राजकुमार हिरानी आणि शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याबरोबरच ती प्रतीक गांधीबरोबरच ‘वो लडकी है कहा’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.