Tamannaah Bhatia Virat Kohli: तमन्ना भाटियाचं अभिनेता विजय वर्माशी काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं. तमन्नाचं नाव आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींशी जोडलं गेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली. तमन्ना व विराट यांनी एकेकाळी एकमेकांना डेट केलं अशा चर्चा होत्या. तसेच तमन्नाचा पाकिस्तानी क्रिकेटपटूबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांनी गुपचूप लग्न उरकल्याचं म्हटलं गेलं. आता तमन्ना या दोन्ही व्हायरल फोटोंवर स्पष्टीकरण दिलं आहे.
२०१० मध्ये, तमन्ना आणि विराट कोहलीचा एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघे डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता १५ वर्षांनी तमन्नाने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
तमन्ना भाटियाने विराट कोहलीला डेट केल्याच्या चर्चांवर मौन सोडलंय. “मला फार वाईट वाटतं, कारण मी त्यांना फक्त एकच दिवस भेटले होते. त्या शूटिंगनंतर मी कधीच विराटला भेटले नाही. शूटिंगवेळी मी त्यांच्याशी बोलले नव्हते, तसेच परत आमची कधीच भेटही झाली नाही,” असं तमन्ना भाटिया म्हणाली.

अब्दुल रझाकबरोबरच्या लग्नांच्या वृत्तांवर तमन्ना म्हणाली…
तमन्ना भाटिया व माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाक एका ज्वेलरी स्टोअरमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर या दोघांनी लपून लग्न केल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यावर तमन्ना म्हणाली, “अब्दुल रझाक! इंटरनेट एक मजेदार जागा आहे. इंटरनेटनुसार, माझे लग्न काही काळासाठी अब्दुल रझाकशी झाले होते.”
तमन्ना भाटियाने मागितली माफी
तमन्ना भाटियाने गमतीने कॅमेऱ्याकडे पाहून हात जोडले. “मला माफ करा सर, तुम्हाला दोन-तीन मुलं आहेत… तुमचे आयुष्य कसे आहे हे मला माहित नाही,” असं तमन्ना म्हणाली. या चर्चा अत्यंत लाजिरवाण्या होत्या, असं म्हणत तमन्नाने त्या फोटोबद्दल स्पष्टीकरण दिलं. व्हायरल झालेला फोटो एका ज्वेलरी स्टोअरच्या उद्घाटनाचा होता, तिथे दोघांची भेट झाली होती. ती भेट हा निव्वळ योगायोग होता.
सोशल मीडियावर एखादा फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा पसरतात. काही वेळा तर बनावट फोटो व व्हिडीओही व्हायरल होत असतात. या अफवांबद्दल तमन्ना म्हणाली, “हे सगळं खूप विचित्र आहे. कशाचा कशाचीच संबंध नसताना लोक गोष्टी तयार करतात. पण याबद्दल आपण काहीच करू शकत नाही, हे आपण स्वीकारायला हवं. ज्याला जसा विचार करायचा आहे, तसाच तो करणार. तुम्ही सर्व गोष्टी नियंत्रित करू शकत नाही.”