वाढलेलं वजन कमी करणं सोपं नाही. जर तुम्हीही कधी वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कडक डाएट प्लॅन फॉलो केला असेल तर त्यात एक गोष्ट आवर्जून असते. ती म्हणजे गोड खायचं नाही. साखर पूर्णपणे बंद करणं अनेकांसाठी कठीण असतं. गोड खाण्याची इच्छा असूनही स्वतःवर नियंत्रण ठेवणं ही अवघड गोष्ट आहे. पण वजन कमी करून फिट होण्यासाठी साखर पूर्णपणे बंद करणं नेहमीच फायदेशीर असतं असं नाही.
सेलिब्रिटी फिटनेस कोच सिद्धार्थ सिंहने तमन्ना भाटियासह अनेकांबरोबर काम केलं आहे. त्याने सांगितलं की दररोज थोडं गोड खाल्ल्याने फिटनेस गोल्स साध्य करण्यात मदत होतं. सिद्धार्थने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यात प्रत्येक कोचने डाएर प्लॅनमध्ये थोड्या प्रमाणात साखरेचा किंवा गोड पदार्थांचा समावेश करावा, असं म्हटलंय. कारण जेवढं आपण स्वतःला एखाद्या पदार्थापासून जबरदस्तीने दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेवढीच ते खाण्याची क्रेव्हिंग वाढते.
गोड पूर्णपणे बंद केल्यास काय होतं?
सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार, फिटनेस प्रवासात थोडं गोड खाल्ल्यास आपल्या डाएट फ्लॅनमध्ये सातत्य राहण्यास मदत होते. “जेव्हा तुम्ही दररोज ठराविक प्रमाणात साखर असलेल्या पदार्थांचे सेवन करता तेव्हा तुम्ही त्या डाएट प्लॅनमध्ये सातत्य ठेवण्याची शक्यता जास्त असते. पण गोड पूर्णपणे बंद केल्यास कमी काळात तुमचे क्रेव्हिंगवर जास्त काळ नियंत्रण राहू शकत नाही,” असं सिद्धार्थ सिंह सांगतो.
फिटनेस कोच सिद्धार्थच्या मते, “वर्कआउटनंतर प्रोटीन शेकबरोबर केळं खाणं उत्तम आहे.” दररोजच्या आहारात थोडं साखरेचं प्रमाण असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने हेल्दी खाण्याची सवय होऊ शकते. “बरेचदा डाएट प्लॅन फेल ठरतात, कारण त्यात परफेक्शनची अपेक्षा असते. पण दररोज थोडं गोड खाल्ल्याने मेंदूला जीवनाचा आनंद घेता येतो, त्याचबरोबर फिटनेस गोलही साध्य करता येतो,” असं सिद्धार्थ सिंह सांगतो.
थोडक्यात काय, तर साखर किंवा गोड पदार्थ पूर्णपणे टाळण्यापेक्षा नियंत्रित प्रमाणात दररोज घेणं तुमच्या आरोग्य आणि फिटनेस दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकतं.
