बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री तमन्ना भाटियाने एका पॉडकास्टमध्ये रिलेशनशिपवर केलेल्या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने रिलेशनशिपमध्ये कोणते रेड फ्लॅग असतात त्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “आपल्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न केला तर ते एखाद्यावर नियंत्रण ठेवल्यासारखे होईल आणि कोणत्याही नात्यात हा सर्वात मोठा धोका असतो. याबरोबरच, जी व्यक्ती खोटं बोलते तिच्याबरोबर अजिबात राहू नका. विशेषत: जे अगदी छोट्या गोष्टींसाठी खोटं बोलतात.”
नातं चांगलं राहावं यासाठी पुरुषांनी कोणती गोष्ट केली पाहिजे?
नातं चांगलं राहावं यासाठी पुरुषांनी कोणती गोष्ट केली पाहिजे? असा प्रश्न विचारल्यावर उत्तर देत तमन्ना म्हणाली, “तुमच्या जोडीदाराचे ऐका. खरं तर समस्या सोडवणे महत्वाचे नसते. फक्त त्यांच्याजवळ थांबा, तुमची जोडीदार काय म्हणतेय ते ऐका. तिला सहानुभूती द्या. तुम्ही तिचं ऐकत आहात, तुम्ही तिच्याबरोबर आहात, याची तिला जाणीव होऊ द्या. तिच्या समस्या, तिच्या इच्छा-आकांक्षा, ती तुमच्यासाठी महत्वाची आहे. हे तिला कळू द्या.”
“माझ्यासाठी सकारात्मक बोलणे आणि वेळ देणे हीच प्रेमाची भाषा आहे. जी प्रेमाची पाच रुपं आजकाल चर्चेत आहेत, त्याबद्दल बोलायचे तर काहींना एखादी गोष्ट जास्त प्रमाणात पाहिजे असते, दुसऱ्याला ती कमी प्रमाणात हवी असते. माझ्याबद्दल सांगायचे तर माझे वय जेव्हा कमी होते, त्यावेळी जर मला कोणी भेटवस्तू द्यायचा प्रयत्न केला तर मला फार राग यायचा. मला असे वाटायचे की ते काहीतरी करू शकतात, हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते नात्यावर पैशांचा टॅग लावत आहे, असे वाटायचे,” असं तमन्ना म्हणाली.
भूतकाळातील दोन नात्यांमधून ‘हे’ शिकले
अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझ्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल बोलायचे तर, मला जे माझ्या जोडीदारामध्ये पाहिजे, ते मी स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचे. पुढची व्यक्ती मी जे करतेय ते स्वीकारण्याच्या मनस्थितीत आहे की नाही हे न बघताच मी फक्त करत राहायचे. यामुळे एक वेगळ्या प्रकारचे वाईट नाते तयार होते. पण नंतर मला समजत गेले की नाते हे दोन्ही बाजूंनी असायला हवे. हे मी माझ्या भूतकाळातील दोन नात्यांमधून हे शिकले आहे.”
हेही वाचा: दिग्दर्शकानं मांडीवर बसवून बळजबरी किस केलं; अभिनेत्रीचा आरोप
“मी नात्यात प्रामाणिक असते, समोरच्या व्यक्तीची काळजी घेते, समोरची व्यक्ती जे सांगत नाही, ते मी उत्तम प्रकारे समजून घेऊ शकते. मला एक स्त्री म्हणून चांगली गोष्ट ही वाटते की आम्हाला सगळ्यांना माहीत असते आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टींचा त्रास होत आहे,” असं तमन्ना म्हणाली.
‘या’ कारणांमुळे झाले होते ब्रेकअप
भूतकाळातील तिच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना ती म्हणते, “भूतकाळातील माझ्या दोन्ही रिलेशनशिपमुळे मला व्यक्ती म्हणून स्वत:चा विकास करण्यात मदत झाली. पहिले नाते तुटले कारण मी खूपच लहान होते. मला आणखी गोष्टी हव्या होत्या. एका व्यक्तीमुळे मला इतर गोष्टी गमवायच्या नव्हत्या. मला वाटले आणखी खूप काही बघायचे आहे. त्यामुळे ते नाते तुटले आणि दुसरे रिलेशनशिप यामुळे तुटले की मला दिसत होते, ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य नाही. त्याचा प्रभाव माझ्या आयुष्यावर होता, दीर्घ काळासाठी तो प्रभाव चांगला नसता.”
दरम्यान, तमन्ना भाटिया नुकतीच ‘स्त्री २’ या चित्रपटात दिसली आहे.