Tanishaa Mukerji on breakup: दिग्गज अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांची मुलगी व काजोलची सख्खी बहीण तनिषा मुखर्जी सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. विकी लालवाणीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिची करिअर, बहीण काजोल, तसेच तिची रिलेशनशिप यांबाबत वक्तव्य केले आहे.
तनिषाने तिच्या करिअरच्या सुरुवातीला यश राज फिल्म या प्रॉडक्शनच्या काही चित्रपटांमध्ये काम केले. आता मुलाखतीत तिने आदित्य चोप्राचा भाऊ उदय चोप्राबरोबरच्या नात्याबद्दल वक्तव्य केले आहे.
“त्यामुळे आम्ही ब्रेकअप करण्याचा…”
तनिषा मुखर्जी म्हणाली, “आम्ही नील ‘एन’ निक्की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डेट करायला सुरुवात केली होती; पण गोष्टी तशाच राहिल्या नाहीत. आमच्यात गोष्टी बिघडत गेल्या. त्यामुळे आम्ही ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला”, असे म्हणत अभिनेत्रीने उदय चोप्राबरोबरच्या नात्याबद्दल वक्तव्य केले. काही रिपोर्टनुसार, तनिषा व उदय यांचे ब्रेकअप हे लग्नाआधीच्या करारामुळे झाले होते. यावर तनिषाने वक्तव्य केले.
अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा मीडियाद्वारे कलाकारांच्या रिलेशनशिपबद्दल बोलले जाते. त्यांच्याबद्दल सांगितले जाते. तेव्हा चाहतेदेखील त्या नात्यात गुंतून जातात. जर माध्यमे तुमच्याकडे एक सुंदर जोडपे म्हणून पाहत असतील, तर प्रेक्षकदेखील ते एक सुंदर जोडपे आहे, या विश्वासाने तुमच्याकडे पाहतात. माध्यमांमध्ये प्रेक्षकांची धारणा बदलण्याची आणि ती नियंत्रित करण्याची क्षमता आहे. परंतु, त्यांना हे सुंदर जोडपे काय अनुभवत असते किंवा बंद दारामागे काय घडत आहे याची कोणतीही कल्पना नसते.”
या मुलाखतीत तिला विचारले गेले की, लग्नापूर्वीच्या करारामुळे उदय व तिचे ब्रेकअप झाले का? यावर ती म्हणाली, “यामध्ये काहीही तथ्य नाही. उदय आणि त्याच्या कुटुंबाचा मी इतका आदर करते की, मी याबाबत काहीही बोलू शकत नाही. आमचे नाते खूप चांगले होते आणि नाती तुटतात. आता आम्ही संपर्कात नाही. ब्रेकअप झाल्यानंतर एक्स बॉयफ्रेंडच्या संपर्कात राहणे माझ्यासाठी फार कठीण असते.”
‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत उदय चोप्राबरोबर झालेल्या ब्रेकअपबद्दल अभिनेत्री म्हणाली की, उदयबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्या दु:खातून बाहेर येणे कठीण होते. कारण- रिलेशनशिपमध्ये येण्याआधी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. खूप काळापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. त्यामुळे जेव्हा आम्ही वेगळे झालो, तेव्हा त्याचा सामना करणे कठीण गेले होते.