Tanishaa Mukerji on relationship: दिग्गज अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांची मुलगी अभिनेत्री तनिषा मुखर्जी ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केले आहे.
तनिषा मुखर्जीच्या रिलेशनशिपची वेळोवेळी चर्चा झाली. मग ते अरमान कोहलीबरोबरचे वा उदय चोप्राबरोबरचे नाते असो. आता पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर उघडपणे वक्तव्य केले आहे.
तनिषा मुखर्जी काय म्हणाली?
या मुलाखतीत अरमान कोहलीपासून वेगळे होण्यावर तनिषा मुखर्जी म्हणाली, “मी आणि अरमान जेव्हा वेगळे झालो, मला फार वाईट वाटले नव्हते. आमच्या नात्याबद्दल खूप चर्चा झाली होती, त्यामुळे लोकांना वाटले असेल की ते नाते संपल्यानंतर मी फार दु:खात असेन, पण तसे काही घडले नव्हते.”
अरमान कोहली व तनिषा मुखर्जीचे नाते बिग बॉसच्या घरात सुरू झाले होते. ते दोघेही बिग बॉसच्या ७ व्या पर्वात सहभागी झाले होते. शो संपल्यानंतर या दोन्ही कलाकारांनी काही महिने एकमेकांना डेट केले. त्यानंतर मात्र त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
तनिषाच्या आणखी एका नात्याची मोठी चर्चा झाली होती. अभिनेता उदय चोप्रा व तनिषा मुखर्जीचे नाते मोठ्या चर्चेत होते. तनिषा म्हणाली, “जेव्हा आम्ही वेगळे झालो, तेव्हा त्यातून बाहेर पडणे कठीण होते; कारण आम्ही एकमेकांना डेट करण्याआधी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. माझे जेव्हा उदयबरोबर ब्रेकअप झाले तेव्हा मला फार वाईट वाटले होते. आम्ही एकमेकांच्या खूप जवळचे होतो. एकमेकांना अनेक वर्षांपासून आम्ही ओळखत होतो.”
अनेक वेळा ब्रेकअप झाल्यानंतरही नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे अभिनेत्रीने म्हटले. ती म्हणाली, “मी अशी व्यक्ती आहे, ज्या गोष्टी घडतात, त्याच्या चांगल्या बाजूकडे मी बघते. मला नेहमी असे वाटते की जे काही घडते, ते चांगल्यासाठी घडते. हा आपल्या आयुष्याचा भाग असतो. एखादी गोष्ट संपते, तेव्हा पुढे जाणे गरजेचे असते. नाती तुटल्यामुळे, ब्रेकअप झाल्यामुळे माझ्यात कडवटपणा आला नाही.”
ती गोष्टी कशाप्रकारे हाताळते, त्याला कशी सामोरी जाते, यावर बोलताना तनिषा म्हणाली, “जर कामाबाबतीत असेल तर मी माझ्या आईशी बोलते.”
कामाच्या बाबतीत बोलायचे तर तनिषा २०२४ मध्ये आलेल्या ‘लव्ह यू शंकर’ चित्रपटात दिसली होती. २०२३ मध्ये ‘झलक दिखला जा ११’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.