Tanushree Dutta Breaks Down In Tears : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता कायमच चर्चेत असते. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली तनुश्री ‘हॅशटॅग मी टू’ चळवळीमुळे २०२० मध्ये पुन्हा एकदा चर्चेत आली होती. सध्या तिने सोशल मीडियावर शेअर केलेला ओक्साबोक्शी रडतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने मंगळवारी ( २२ जुलै ) रात्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये माझ्याच घरात गेल्या काही वर्षांपासून मला त्रास दिला जात आहे, असा दावा अभिनेत्रीने केला आहे. याशिवाय यासंदर्भात मदतीसाठी पोलिसांना फोन केल्याचंही अभिनेत्रीने म्हटलं आहे.
तनुश्री या व्हिडीओमध्ये प्रचंड अस्वस्थ व रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सांगते, “मी आता या त्रासाला कंटाळले आहे. २०१८ पासून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. #Metoo नंतर हे सगळं सुरू झालं पण, आता मला सहन होत नाहीये म्हणूनच मी पोलिसांना फोन केला. प्लीज मला कोणीतरी मदत करा. खूप उशीर होण्याआधी प्लीज काहीतरी करा.”
व्हिडीओमध्ये तनुश्री पुढे म्हणते, “माझ्या स्वत:च्या घरातच माझा छळ होतोय. याबाबत मी पोलिसांना फोन केला होता. त्यांनी मला रितसर तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. माझी प्रकृती सध्या ठीक नाहीये, त्यामुळे मी उद्या किंवा परवा पोलीस स्टेशनमध्ये जाईन. गेल्या ४-५ वर्षांत माझी प्रकृती खूपच बिघडली आहे. माझं संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालं आहे.”
“माझ्या घरात काम करण्यासाठी मी मदतनीस सुद्धा ठेवली नाहीये. कारण, मला मदतनीसांच्या बाबतीत चांगला अनुभव आलेला नाहीये. त्यांनी माझ्या घरात चोरीचा प्रयत्न केल्याने आता मी कोणालाच कामावर ठेवणार नाहीये. सगळं काम मी एकटी करते, मला मदतीची खरंच खूप गरज आहे.” असं तनुश्रीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
तनुश्री दत्ताने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. दुसऱ्या एका पोस्टमध्ये अभिनेत्रीने घराच्या दाराबाहेर विचित्र आवाज येत असल्याचं देखील म्हटलं आहे. तनुश्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, अद्याप अभिनेत्रीने कसलाच खुलासा केलेला नाही. त्यामुळे तिचं ओक्साबोक्शी रडणं पाहून नेटकऱ्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.