Tanvi The Great Budget : अभिनेते अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा ‘तन्वी द ग्रेट’ १८ जुलै रोजी रिलीज झाला. टीमने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. अनुपम खेर यांनी त्यांचे ऑस्कर विजेते मित्र रॉबर्ट डी नीरो यांना न्यू यॉर्कमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरला बोलावलं. ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’बरोबर रिलीज झाला. पण तो पाच दिवसांत २ कोटीही कमवू शकला नाही.
‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी ५० कोटी रुपये खर्च आला होता, असं अनुपम खेर यांनी स्वतः कबूल केलंय. हे पैसे अनुपम यांनी मित्र आणि ओळखीच्या लोकांच्या मदतीने गोळा केले होते.
रिपब्लिकला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले की ज्याने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली होती, त्याने शूटिंगच्या काही आठवड्यांआधी काढता पाय घेतला. त्यामुळे अनुपम यांनी ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन चित्रपट पूर्ण करायचं ठरवलं. या चित्रपटाचे १० निर्माते आहेत, यापैकी काही डॉक्टर व व्यावसायिक आहेत. या चित्रपटाचे बजेट ५० कोटी असून त्यासाठी कोणत्याही कलाकाराने पैसे घेतलेले नाहीत.
चित्रपटाचे कलेक्शन चांगले नसेल, तर…
“तन्वी द ग्रेटने फार चांगले कलेक्शन केलेले नाही. दुर्दैवाने, गेल्या १० वर्षांत जे घडलंय, त्यानुसार चित्रपट कसा आहे हे त्याच्या कलेक्शनवरून ठरतं. जर एखाद्या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले नाही, तर तो चांगला चित्रपट नाही, असं लोकांना वाटतं. मी या सिनेमाची बाजू घेत नाहीये, कारण मीही याच इंडस्ट्रीचा एक भाग आहे,” असं अनुपम खेर म्हणाले.
शूटिंगच्या एक महिन्याआधी निर्मात्याने काढता पाय घेतला
“जेव्हा आम्ही या सिनेमाचं बजेट ठरवलं तेव्हा ते तब्बल ५० कोटी रुपयांवर पोहोचलं. एक गृहस्थ होते, त्यांनी आम्हाला बजेटच्या ५०% रक्कम देणार असं म्हटलं, ती खूप मोठी रक्कम होती. सगळं ठरलं, पण शूटिंगच्या एक महिना आधी मला सांगण्यात आलं की ते चित्रपटासाठी पैसे देऊ शकत नाहीत,” असं अनुपम खेर म्हणाले.
अनुपम खेर यांनी मित्रांकडून घेतली मदत
अचानक ते मागे हटल्याने अनुपम खेर यांनी मित्रांची मदत घ्यायचं ठरवलं. “मी अमेरिकेत आणि भारतातील माझ्या काही मित्रांना फोन केले. या चित्रपटाचे १० सह-निर्माते आहेत. हा चित्रपट मुळात लोकांकडून पैसे गोळा करून तयार करण्यात आलाय. मी त्यांना चित्रपटाचा सारांश पाठवला होता. या सर्वांपैकी कोणाचाही चित्रपटांशी संबंध नाही. काही जण व्यावसायिक आहेत, काही डॉक्टर आहेत तर कोणी बँकेत काम करतंय. मी त्यांना म्हटलं होतं की चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मी पैसे परत करेन, पण त्यापैकी कोणीही अद्याप पैसे मागितलेले नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हापर्यंत माझ्याकडे पैसे नसतील तेव्हापर्यंत पैसे घेणार नसल्याचं सर्व मुख्य कलाकारांनी ठरवलंय. अरविंद स्वामी, जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी, बोमन इराणी यांना भेटून मी जे घडलं ते सांगितलं. मी त्यांना म्हणालो, ‘मी तुम्हाला पैसे नक्की देईन’, आणि ते म्हणाले, ‘आम्ही पैसे मागितले का?’,” असं अनुपम खेर यांनी सांगितलं.
‘तन्वी द ग्रेट’ हा ‘सैयारा’बरोबर रिलीज झाला. ‘सैयारा’ या रोमँटिक चित्रपटाने आतापर्यंत १५० कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर ‘तन्वी द ग्रेट’ला अजून २ कोटींचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.