चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी हिंदी चित्रपटसृष्टी ‘पठाण’नंतर पुन्हा आयसीयु मध्ये गेल्याचं नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. ‘पठाण’ नंतर आलेले एक दोन चित्रपट सोडले तर बाकी सगळ्या बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचं आपल्याला दिसत आहे. नुकतंच तरण आदर्श यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटव्यवसायाबद्दल बरंच भाष्य केलं.
सध्या बॉलिवूड चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधील चढाओढ आणि मोठमोठ्या आकड्यांचे दीखावे याबद्दल तरण आदर्श यांना या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. हे बॉक्स ऑफिस कलेक्शनची संख्या आणि त्यामागील नेमकं तथ्य आणि सध्याची स्पर्धा यावार तरण आदर्श यांनी खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “असे चित्रपट फ्लॉप होणं…” चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांची ‘आदिपुरुष’वर जोरदार टीका
तरण आदर्श म्हणाले, “प्रत्येक निर्मात्याला हे अगदी बरोबर माहिती असतं की त्याचा चित्रपट कोणत्या दिशेने जात आहे आणि किती कमाई करत आहे. सध्या इंडस्ट्रीमध्ये दिखावा करायचा ट्रेंड आला आहे, याबरोबरच आपले कित्येक अभिनेते आहेत ज्यांना कायम दुसऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करायचं आहे. या गोष्टी ७० आणि ८० च्या दशकात होत नव्हत्या. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेद्र असे दिग्गज अभिनेते तसेच राज कपूर, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा, रमेश सिप्पी असे दिग्गज फिल्ममेकर्स यांच्यात कधी बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून चढाओढ किंवा स्पर्धा पाहायला मिळाली नाही.”
पुढे ते म्हणाले, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरे आकडे हे वितरक, निर्माते यांना माहीत असतातच पण आजकाल या बॉक्स ऑफिस कलेक्शनची चर्चा सोशल मीडियावर जास्त होत असल्याने या दीखाव्याला जास्त महत्त्व मिळायला सुरुवात झाली आहे.” एकूणच चित्रपट व्यवसाय आणि त्यातील स्पर्धा ही सोशल मीडियामुळे आणि त्यावरील दीखाव्यामुळे फार वाढल्याचं निरीक्षण ट्रेड एक्स्पर्टतरण आदर्श यांनी मांडलं आहे.