‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर आणि करण जोहरसारख्या निर्मात्यांवर टीका करायला सुरुवात केली होती. चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागला असला तरी ‘ब्रह्मास्त्र’ने चांगली कमाई केली. त्यातील बऱ्याच चुकांवरुन, व्हीएफएक्सवरुन चित्रपटनिर्मात्यांवरही टीका झाली. या चित्रपटाच्या कमाईबाबत कंगना, विवेक अग्निहोत्री अशा कित्येकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. निर्माता करण जोहरला सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अशा प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

याच सगळ्या नकारात्मक वातावरणाला कंटाळून कालच करणने ट्विटरला रामराम ठोकला आहे. काल त्याने ट्वीटकरत याबद्दल खुलासा केला आहे. करण म्हणाला, “मला माझ्या आयुष्यात सकारात्मकता हवी आहे त्यासाठी मी पहिलं पाऊल उचलतो आहे. गुडबाय ट्विटर.” असं म्हणत करणने पहिले ट्विटर सोडलं आणि आता तर त्याने अकाऊंटही डिलीट केल्याची गोष्ट समोर आली आहे.

आणखी वाचा : “तुम्ही देशातील श्रेष्ठ आणि अद्भुत…” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

करणच्या याच भूमिकेवर ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी भाष्य केलं आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले, “खरंच ज्या व्यक्तीला सकारात्मकता हवी असेल तर ती संपूर्ण सोशल मीडियापासून अलिप्त राहील. केवळ ट्विटरवर आपला अजेंडा रेटता येणार नाही म्हणून ट्विटर सोडायचं आणि इन्स्टाग्रामवर ब्रॅंड आणि जाहिराती मिळतात म्हणून सक्रिय राहायचं, याला काहीच अर्थ नाही. आयुष्याकडे बघायचा हा दृष्टिकोनच नकारात्मक आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मैदान सोडून पळून जायची भाषा करणारे कधीच जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीच मैदान सोडून जायची भाषा करत नसतात.” असं ट्वीटही विवेक अग्निहोत्री यांनी केलं होतं. एकूणच करण जोहरच्या या कृतीची सोशल मिडियावर सध्या चांगलीच चर्चा होत आहे. काही लोकं करणला पाठिंबा देत आहेत तर काही अजूनही त्याची खिल्ली उडवत आहेत. करणच्या या दुटप्पी वागण्याचा बऱ्याच नेटकऱ्यांनी निषेधही केला आहे. करण सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉकशोमुळे चांगलाच चर्चेत होता, आता तो रणवीर सिंग आणि आलियाबरोबर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.