‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. केवळ १२ दिवसांमध्येच या चित्रपटाने १५० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र, या चित्रपटावरून अनेक वाद सुरू आहेत. अनेकांनी याला प्रोपगंडा चित्रपट म्हटले. ‘द केरला स्टोरी’चा अभिनेता विजय कृष्णाने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विजय कृष्णाने सांगितले की, सुरुवातीला अनेक लोक या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत होते, पण आता हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांची विचारसरणी बदलली आहे. अनेकांनी त्याला मेसेज करून माफी मागितली आहे. विजय कृष्णाने या चित्रपटात ISIS दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा- रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’मध्ये असणार तगडी स्टारकास्ट! अजय देवगणव्यतिरिक्त ‘हे’ कलाकार दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

विजय कृष्णा म्हणाला, ‘चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीपासून जेव्हा चित्रपटावर टीका केली जात होती तेव्हा मला खूप भीती वाटली. आमची विचारसरणी अशी नव्हती. आम्ही एक मानवी कथा बनवण्याचा प्रयत्न करत होतो आणि खरोखरच आमचा उद्देश चार मुलींवर झालेल्या आघातांवर प्रकाश टाकणे हा होता, परंतु जेव्हा असे प्रकार सुरू झाले तेव्हा मी अस्वस्थ झालो आणि काही दिवस झोपलो नाही. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि २ ते ३ दिवसांनी आम्ही पाहिले की, लोक त्याला पाठिंबा देत आहेत. जेव्हा मी लोकांना चित्रपटाशी जोडलेले पाहिले तेव्हा मला खूप दिलासा मिळाला.

हेही वाचा- साखरपुड्यानंतर परिणीती चोप्रा मुंबईकडे रवाना, होणाऱ्या नवऱ्यासाठी खास पोस्ट करीत म्हणाली, “माझे ‘प्रेम’ इथे…”

विजय कृष्णा पुढे म्हणाला की, ‘बरेच लोक या चित्रपटाला सुरुवातीला प्रोपगंडा म्हणत होते. आता ते सोशल मीडियावर माझी माफी मागत आहेत. ते म्हणतात की ही एक हृदयस्पर्शी कथा आहे, मानवी कथा आहे असे आम्हाला वाटले नाही. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काही मुलींची कथा आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून आधी धर्मांतर केले जाते आणि नंतर त्यांना ISIS संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते.

‘द केरला स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. अवघ्या १२ दिवसांमध्ये चित्रपटाने १५० कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या रविवारी या चित्रपटाने २३.७५ कोटींची कमाई केली आहे. तर सोमवारी या चित्रपटाने १०.३० कोटींची कमाई केली आहे.