दीपिका पादुकोण ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने २००७ च्या ब्लॉकबस्टर ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून शाहरुख खानबरोबर पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दीपिकाबरोबर ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून आणखी एका अभिनेत्रीने पदार्पण केलं होतं. दीपिकाने २०१८ मध्ये लग्न केलं, त्याच वर्षी या अभिनेत्रीने लग्न केलं आणि २०२४ मध्ये दीपिका आई झाली. याच वर्षी या अभिनेत्रीनेही आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं.

दीपिका पादुकोणप्रमाणेच या अभिनेत्रीलाही मुलगीच झाली. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती म्हणजे युविका चौधरी होय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, युविकाने तिच्या आणि दीपिकामधील या कनेक्शनबद्दल सांगितलं. ‘ओम शांती ओम’मधून पदार्पण करण्यापूर्वी गायक हिमेश रेशमियाच्या लोकप्रिय संगीत अल्बम ‘आप का सुरुर’ मधील वेगवेगळ्या गाण्यांमध्ये युविका व दीपिका दोघींनी काम केलं होतं. दीपिका ‘नाम है तेरा’ या हिट गाण्यात दिसली, तर युविका ‘वादा तेनु’ मध्ये झळकली होती.

युविकाने सांगितलं दीपिकाबरोबरचं कनेक्शन

युविका हिंदी रशशी बोलताना म्हणाली, “मला आमच्या आयुष्यात इतकं साम्य आहे हे आधी लक्षात आलं नव्हतं. पण हेच नशिब आहे. पण आमच्यात नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. आम्ही हिमेश रेशमियाच्या अल्बममध्ये होतो. एका गाण्यात ती होती आणि मी दुसऱ्या गाण्यात होते. त्यावेळी आम्ही एकत्र बसून निवांत वेळ घालवायचो.”

युविकाने दीपिका पादुकोणबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. “ती खूप मेहनती आणि खूप चांगली मुलगी आहे. ती तिच्या कामाबद्दल प्रामाणिक आहे. तिला मुलाखतींमध्ये पाहून छान वाटतं आणि कधीकधी लोक तिला ट्रोल करायचे तेव्हा मला राग येतो,” असं युविका म्हणाली. दीपिकाला बॉलीवूडमध्ये खूप यश मिळालं, पण त्या तुलनेत युविकाचं करिअर फार चांगलं राहिलं नाही.

युविका चौधरीचे करिअर

युविका चौधरीने ओम शांती ओम, तो बात पक्की, समर 2007, नॉटी @ 40, एनेमी या चित्रपटांमध्ये झळकली. तसेच तिने ‘द शौकिन्स’मध्येही छोटी भूमिका केली होती. नंतर तिने टीव्ही मालिका, रिअॅलिटी शो केले. युविका व तिचा पती प्रिन्स नरुला नच बलिए ९ चे विजेते ठरले होते.