चित्रपट फ्लॉप होईल की हिट हे प्रेक्षक ठरवतात. दरवर्षी अनेक चित्रपट रिलीज होतात, त्यातले काही गाजतात; तर काही चित्रपट केव्हा रिलीज होतात आणि गाशा गुंडाळतात हे कळतही नाही. एका बॉलीवूड स्टारने त्याच्या करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट दिले होते. करिअरमध्ये इतके फ्लॉप चित्रपट देणारा हा सुपरस्टार आजही सिनेसृष्टीत सक्रिय आहे.

या स्टारची गणना ८० च्या दशकात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना आणि राजेश खन्ना यांसारख्या सुपरस्टार्समध्ये व्हायची. प्रचंड संघर्ष केल्यानंतर सिनेसृष्टीत या अभिनेत्याला यश मिळालं, चित्रपटाच्या खूप ऑफर आल्या. अभिनेत्याने चित्रपटही केले, पण त्यातले अनेक फ्लॉप ठरले होते.

करिअरमध्ये इतके फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याचे नाव मिथुन चक्रवर्ती होय. मिथुन यांनी त्यांच्या ४७ वर्षांच्या करिअरमध्ये १८० फ्लॉप चित्रपट दिले. त्यांनी स्वतःचे २०० चित्रपट पाहिलेच नसल्याचं म्हटलं जातं. मिथून चक्रवर्ती यांनी इतके फ्लॉप चित्रपट दिले असले तरी त्यांच्या हिट चित्रपटांची संख्याही मोठी आहे. मिथुनदा दरवर्षी एक डझनपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करायचे. एक वेळ अशी आली होती की मिथुन यांनी सलग ३३ फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले होते. १९८९ साली तर वर्षभरात त्यांनी तब्बल १९ चित्रपट केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २७० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला, त्यापैकी १८० चित्रपट फ्लॉप आहेत. या यादीत त्यांच्यानंतर जितेंद्र यांचा नंबर लागतो. जितेंद्र यांच्या नावावर १०१ फ्लॉप चित्रपट आहेत.

“मी ३७० हून अधिक चित्रपट केले आहेत, त्यापैकी जवळपास २०० चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेले नाहीत. मी सर्व चित्रपटांमध्ये पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले,” असं एका मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिथुन चक्रवर्ती यांची संपत्ती

मिथुन यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि खूप लोक त्यांना सुपरस्टार मानतात. ते जवळपास ४०० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत ज्यात मर्सिडीज बेंझ 1975, टोयोटा फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हरसह अनेक आलिशान कारचा समावेश आहे.