माणसाचं मन ही खूप मोठी अजब गोष्ट आहे. समुद्र जसा अथांग असतो त्यापेक्षाही जास्त अथांग असतं ते म्हणजे माणसाचं मन. या मनाच्या तळाशी काय काय दडलंय? हे अनेकदा स्वतःचं स्वतःलाही कळत नाही. माणसाला विस्मृतीचं वरदानही आहे आणि शापही पण तो सहसा त्याचं पहिलं प्रेम, त्याचं बालपण, त्याचा उगम या गोष्टी कधीही विसरत नाही. Netflix वर नुकताच प्रदर्शित झालेला Three Of Us हा सिनेमा याच माणसाच्या आठवणींचा, विस्मृतींचा खेळ आहे.

तिघांची गोष्ट

सिनेमाच्या नावाप्रमाणेच ही तिघांची गोष्ट आहे. शैलजा पाटणकर, दीपांकर देसाई आणि प्रदीप कामत. शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत या तिघांनी या भूमिका साकारल्या आहेत. शैलजा ही मॅरेज कौन्सिलर म्हणून काम करते. तिचा नवरा दीपांकर हा इन्शुरन्सचं काम करतो. तर प्रदीप कामत बँकेत आहे. प्रदीप कोकणात तर शैलजा आणि दीपांकर मुंबईत. या दोघांना एक मुलगाही आहे. शैलजाला एक दिवस वेंगुर्ल्याला जाण्याची इच्छा होते. आठवडाभराची सुट्टी काढून ती नवऱ्यासह वेंगुर्ल्याला जाते. तिथे सात दिवसात काय काय घडतं? काय काय उलगडतं? त्याची कहाणी म्हणजे हा सिनेमा आहे. एक नितांत सुंदर अनुभव आपण या सिनेमातून घेतो यात काही शंकाच नाही.

खास स्वप्नांच्या प्रदेशात

माणसाचं बालपण, त्याची शाळा, त्याचे बालपणीचे मित्र हे आयुष्याच्या धबडग्यात कुठेतरी हरवत चाललेले असतात. त्या सगळ्यांना तो भेटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो पुन्हा एकदा त्या वयात जातो. शैलजा, दीपांकर आणि प्रदीप या तिघांचीही गोष्ट सांगणारी ही कथा आहे. त्यात तीन वेगळे गोफ आहेत. जे अत्यंत सुंदररित्या दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी विणले आहेत. सिनेमा माणसाच्या मनाच्या तळाचा ठाव घेणारा आहे. एक तास चाळीस मिनिटांच्या या प्रवासात आपण हरवून जातो, कुठेतरी आपल्यालाही आपल्या लहानपणीच्या, शाळेतल्या गोष्टी आठवतात. मन मोहरून जातं, काही प्रसंगांत अपराधीही वाटतं, काही प्रसंगांमध्ये हो अगदी असंच तर घडलं होतं हे सांगून जातं. चकचकीत बेगडी स्वप्नांच्या दुनियेपेक्षा हा सिनेमा खरीखुरी स्वप्नं दाखवतो. अगदी आपल्या लहानपणी पडायची तशीच. हेच या सिनेमाचं मुख्य यश मानलं पाहिजे.

कॅमेरा वर्क, फ्रेमिंग खूप उत्तम

कॅमेरा वर्क उत्तम आहे, अविनाश अरुण यांनीच ते केलं असल्याने त्यांना काय सांगायचं आहे हे त्यांना चपखल कळलं आहे. खास करुन शैलजा जेव्हा समुद्रावर जाते तो प्रसंग किंवा एका किल्ल्यात दीपांकर, शैलजा आणि प्रदीप एकत्र असतात तो प्रसंग हे उत्तमरित्या साकारले आहेत. सिनेमाची पटकथाही दमदार आहे. अविनाश अरुण, ओमकार बर्वे आणि अर्पिता चटर्जी या तिघांनीही पटकथा लिहिली आहे. तसंच शेफाली शाह, जयदीप अहलावत आणि स्वानंद किरकिरे या तिघांनी उत्तम अभिनय केला आहे. या सिनेमाची सर्वात जमेची बाजू आहे ती म्हणजे यातले संवाद.वरुण ग्रोव्हर आणि शोएब जुल्फी नझीर यांनी सिनेमाचे संवाद लिहिले आहेत.

सहजसुंदर संवाद ही जमेची बाजू

‘कोंकण छोडके कौन किधर जायेगा?’, ‘मै गयीं ना..’ ‘वापस भी तो आयी ना!’ ‘मै सोशल सिक्युरीटी एजंट हूँ, लाइफ इन्शुरन्स बेचता हूँ. मगर अच्छा नहीं लगता ये काम.’ ‘क्यूँ?’ ‘लोगोंको डरना पडता है, झूठ बोलना पडता है की कल कुछ बुरा हो सकता है इस लिये आज लाइफ इन्शुरन्स ले लो.’ ‘शैलजा ने बताया मुझे आप दोन बचपन के दोस्त हैं..’ “बचपन में तो सभी दोस्त होते हैं.” ‘स्कूल..पिछले जनम की बात लगती हैं अब तो कभी कभी’, ‘कितनी खिंच खिंच हैं यहां चलने में भी, कैसे रहा होगा तब..पर सच में ऐसा होता है..”बडे हो जाओ तो बचपन की चीजे, जगहें छोटी लगनी लगतीं हैं..'”मुझे लगता है बचपनमें ना दिल बडा होता है तो जगह भी बडी बडी लगती हैं..” असे वरवर साधेसेच वाटणारे पण गहिरा अर्थ असणारे संवाद या सिनेमात आहेत.

Three Of Us Movie
थ्री ऑफ अस सिनेमा (फोटो-फेसबुक)

शेफाली शाह आणि जयदीप अहलावत यांचा सुंदर अभिनय

शैलजाच्या भूमिकेत शेफाली शाहने जान ओतली आहे. यात काही शंकाच नाही. तिचं मुंबईत असणं, नंतर कोकणाकडे मनाने ओढ घेणं, तिच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग, तिचं वेंगुर्ल्याला आल्यावर उलगडत जाणं हे जे काही शेफाली शाहने साकारलं आहे ते अगदी चपखल आहे. स्वानंद किरकिरेंचा दीपांकरही उत्तम. खासकरुन जेव्हा दीपांकर प्रदीपला म्हणतो, “चलो शैलजा के बारेमें ऐसा कुछ तो है जो मुझे पता हैं और तुम्हे नहीं.” या तिघांचेही अभिनय उत्तमच आहे. भाव खाऊन गेलाय तो प्रदीप कामत अर्थात जयदीप अहलावत. बालपणीची मैत्रीण भेटायला आली आहे हे जेव्हा तो पत्नीला सांगतो तेव्हा त्यांचा एक संवाद आहे. “शैलजा चाहती है की मै उन दोनो के साथ पुरानी जगह जाऊं.. तुम्हारा मन क्या कहता हैं? दुविधा में है बेचारा…!” ही जी ओळ जयदीप अहलावतने म्हटली आहे ती खरंच आपल्या मनातल्या अस्वस्थतेलाही स्पर्श करुन जाते. आपल्या मनातही असंच द्वंद्व अनेकदा सुरु असतं. त्यावर प्रत्येकवेळी उत्तर मिळतंच असं नाही… उत्तर मिळालं तरीही द्वंद्व संपत नाही अशीही अवस्था होतेच. त्या अवस्थेला जयदीप अहलावत अगदी सहज स्पर्श करुन जातो. संजय मोने, सुहिता थत्ते, नीना कुलकर्णी, कादंबरी कदम यांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. मात्र जयदीप अहलवातने खरोखर कमाल केली आहे.

शैलजा आणि प्रदीप कामत जेव्हा हॉटेलमध्ये बोलत असतात तेव्हाचा एक प्रसंग आहे. शैलजा जेव्हा प्रदीपला त्याच्या वडिलांविषयी विचारते तेव्हा एक दीर्घ संवाद प्रदीपच्या तोंडी आहे. त्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. वडिलांबाबत तो जे काही सांगतो ते पाहून त्याला जसं रडू येतं तसंच आपल्यालाही. कलाकाराची आणि प्रेक्षकाची नाळ कशी जोडली जाते? त्याचं उत्तर या प्रसंगातून मिळतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिनेमा संपताना एक प्रसंग आहे. त्या प्रसंगात शेफाली शाह आणि जयदीप अहलवात यांनी केलेला अभिनय हा अत्यंत तरल, भावस्पर्शी आणि काळजाचा ठाव घेणारा आहे. तसंच या प्रसंगानंतर जेव्हा सिनेमाचा शेवट होतो तेव्हा तर आपल्याला असंख्य आठवणी आपल्या डोळ्यासमोरुन झरझर निघून जातात, अगदी फ्लॅशबॅकसारख्या. माणसाच्या मनाचा ठाव घेणारा हा सिनेमा म्हणजे एक वेगळा अनुभव आहे. तो पाहूनच अनुभवयाला हवा!