Bollywood Actress Forcibly Married Off By Parents At 19: विकी कौशल व यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रुक्सार रेहमानदेखील प्रमुख भूमिकेत दिसली होती.
रुक्सार रेहमानने अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच उरी : द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाबरोबरच ‘पीके’, ‘सरकार’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटांतही तिने काम केले आहे. मात्र, अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी, स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी अभिनेत्रीला संघर्ष करावा लागला.
अभिनेत्री बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर काम केल्यानंतरही एक वेळ अशी आली होती की, तिला अभिनय सोडावा लागला होता. पालकांच्या दबावामुळे तिने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता, असा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे.
त्यानंतर मी माझ्या उदरनिर्वाहासाठी…
रुक्सार रेहमान जेव्हा १७ वर्षांची होती, त्यावेळी दीपक आनंद यांच्या ‘याद रखेगी दुनिया’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला होता. त्याबरोबरच अभिनेत्री ‘इतेंहा प्यार की’ या ऋषी कपूर यांच्या चित्रपटातदेखील दिसली होती. मात्र, तिच्या पालकांनी तिला जबरदस्तीने अभिनय क्षेत्र सोडायला लावले आणि तिचे लग्न करून दिले. त्यानंतर तिला मुलगी झाली. त्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “आयशाच्या जन्मानंतर मला जगण्याचे नवीन कारण मिळाले. बाहेरून हे आयुष्य परिपूर्ण वाटत होते. मी एक चांगली पत्नी बनण्याचा प्रयत्न करीत होते; पण कालांतराने त्यात तफावत दिसू लागली.”
पुढे अभिनेत्रीने आठ महिन्यांच्या मुलीसह पळून गेल्याचा खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, “एका रात्री मी जे काही पॅक करू शकत होते, ते पॅक केले. माझी मुलगी फक्त आठ महिन्यांची होती. ती झोपलेली होती. तिला माहीत नव्हते की, आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. मी जे करतेय, ते बरोबर आहे का, हे मी स्वत:ला विचारत राहिले. पण, मला माहीत होते की, हे लग्न वाचविण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले आहेत.
जेव्हा मी माझ्या घरी गेले तेव्हा माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला. ते मला म्हणाले की, सर्वकाही ठीक होईल. त्यानंतर मी माझ्या उदरनिर्वाहासाठी माझ्या गावात म्हणजेच उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये एक कपड्यांचे एक बुटिक सुरू केले; पण मला इंडस्ट्रीमध्ये परत यायचे होते.”
पुढे ती म्हणाली, “वर्षे निघून गेली. एके दिवशी मला फार अस्वस्थ वाटू लागले आणि मी आयेशाला माझ्या पालकांजवळ सोडले. माझ्या आयुष्यातील ही कठीण गोष्ट मी केली होती. पण, मला स्वत:ला पुन्हा सिद्ध करायचं होतं. माझ्या मुलीला उत्तम आयुष्य द्यायचं होतं. २००५ मध्ये जवळजवळ १० वर्षांनंतर पुन्हा नवीन सुरुवात केली. काही छोट्या भूमिका केल्या. खूप ऑडिशन दिल्या. अनेकदा नकार पचवावा लागला. पण, मी थांबले नाही. प्रयत्न करीत राहिले.”
अभिनेत्रीला ‘डी’, ‘सरकार’, ‘उरी’, ‘८३’, ‘पीके’, या चित्रपटांतून एक वेगळी ओळख मिळाली. अभिनेत्रीने चित्रपट निर्माते फारुक कबीर यांच्याबरोबर लग्नगाठदेखील बांधली: मात्र १३ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “ते खूप दु:खदायक होतं. पण, आयशा माझ्या बाजूनं होती. एक वेळ अशी होती की, मला वाटले होते की, सर्व संपले आहे. पण, जेव्हा तुम्ही काहीतरी करण्यासाठी जन्मलेले असता, तेव्हा तुम्ही ते करण्याचा तुमचा मार्ग शोधता.
अभिनेत्रीच्या कामाबाबत बोलायचे, तर ती लवकरच ‘उत्तर दा पुत्तर’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याबरोबरच, ती ‘थँक्स माँ’ या चित्रपटातदेखील दिसणार आहे.