सूरज बडजात्या यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘उंचाई’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. अमिताभ बच्चन, डॅनी डेन्झोंगपा, बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता, सारिका आणि परिणिती चोप्रा यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सूरज बडजात्या यांनी अजरामर ‘हमके आपके है कौन’ चित्रपटाचेही दिग्दर्शनही केले आहे, १९९४ च्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २५० कोटी इतकी कमाई केली होती. हा त्यावेळचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता.

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सूरज बडजात्या यांनी याच चित्रपटाबद्दल एक खुलासा केला. तो म्हणजे ‘हम आपके है कौन’ च्या प्रीमियर पाहून बरेच लोक चित्रपटगृहाबाहेर पडले होते. ज्या लोकांना या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी बोलावलं होतं त्यातले कित्येक लोक हे चित्रपट अर्धवट सोडून जात होते आणि सुरज यांच्यासाठी ही फार चिंतेची बाब होती. इतकंच नाही तर सुरज यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं की ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाला चौथ्या दिवसापासून यश मिळालाय सुरूवात झाली होती.

आणखी वाचा : ‘हेरा फेरी ३’ मधून अक्षय कुमार बाहेर पडल्याचं ऐकून सुनील शेट्टी सुन्न; म्हणाला, “आम्ही तिघेही…”

सुरज म्हणाले, “हम आपके है कौनमधून मी बऱ्याच गोष्टी शिकलो, कारण मला वाटत होतं की की मी सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवला आहे, पण जेव्हा आमचा प्रीमियर होता तेव्हा लोकांना तो चित्रपट फारसा आवडला नव्हता. चित्रपटात खूप गाणी होती आणि प्रत्येक नवीन गाण्याबरोबर कुणीतरी प्रेक्षक बाहेर पडत होतं हे मला स्पष्टपणे आठवतय. चौथ्या दिवसानंतर या चित्रपटाची हवा झाली आणि तो एक सरप्राइज हीट ठरला!”

‘हम आपके है कौन’ प्रमाणेच, सूरज यांच्या ‘उंचाई’नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला मर्यादित स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या ‘उंचाई’ने केवळ प्रेक्षकांच्या रिव्ह्यूमुळे उत्तम कमाई केली आहे. ‘उंचाई’ हा चार मित्रांच्या घनिष्ट मैत्रीवर भाष्य करणारा चित्रपट आहे.