Anuparna Roy quit IT job for films: चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय सध्या मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या पहिल्या चित्रपटाला ८२ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘साँग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

“जेव्हा ती आयटी क्षेत्रात काम…”

आता नुकतेच तिच्या पालकांनी अनुपर्णाच्या या मनोरंजन विश्वातील प्रवासाविषयी वक्तव्य केले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अनुपर्णाचे वडील ब्रह्मानंद रॉय म्हणाले, “तिच्या शालेय जीवनात आम्हाला तिच्यामधील चित्रपटांबद्दल फार प्रेम आणि आवड दिसली नव्हती.”

“ती खूप अभ्यासू होती. पण जेव्हा ती आयटी क्षेत्रात काम करु लागली. तेव्हा तिच्यामध्ये चित्रपटांबाबत आवड निर्माण झाली. तिला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची होती. “

अनुपर्णाने अखेर नोकरी सोडून चित्रपट दिग्दर्शनात काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिच्या कुटुंबातील सदस्य नाराज झाले. २०२१ मध्ये ती पूर्णवेळ चित्रपट निर्मितीत काम करण्यासाठी मुंबईत आली. त्याबद्दल तिचे वडील म्हणाले, “२०२० नंतर जेव्हा आम्हाला पहिल्यांदा तिच्या नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या निर्णयाबद्दल कळले, तेव्हा आम्हाला वाटले की, हे जोखमीचे काम आहे. कारण- तिला चित्रपट निर्मितीचा कोणताही अनुभव नव्हता. परंतु, तिच्यामधील कामाप्रतिचे समर्पण पाहिले. तिचा उत्साह आणि चिकाटी यांमुळे हळूहळू आम्हाला तिच्या क्षमतेबद्दल विश्वास वाटू लागला.

अनुपर्णाची आई मनीषा रॉय म्हणाल्या, “सुरुवातीला मला वाटले होते की, तिला सरकारी नोकरी मिळेल. तिनं विविध क्षेत्रांत करिअर करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही तिला फटकारत असू; पण आमचा विरोध असूनही ती तिच्या मतावर ठाम राहिली आणि आम्हाला तिचा अभिमान आहे.”

अनुपर्णाचा ‘साँँग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ हा पहिला चित्रपट मुंबईतील दोन महिलांमधील नातेसंबंधावर आधारित आहे. या चित्रपटासाठी व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओरिझाँटी गटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. अनुपर्माने हा पुरस्कार जिंकत इतिहास रचला आहे. अनुराग कश्यप ‘साँँग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.