बॉलीवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आजवर आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. कामातील शिस्तबद्ध आणि वक्तशीरपणा यामुळेच आज ते यशाच्या शिखरावर आहेत.
बॉलीवूडमधील एखादा लोकप्रिय नट किंवा अगदी नवोदित कलाकार… अशा प्रत्येकाचीच अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते. आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम केलंही आहे. या प्रत्येकानेच त्याचा कामाचा अनुभव शेअर केला आहे.
अशातच नुकत्याच एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी १९९२ साली आलेल्या ‘खुदा गवाह’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केल्याचा अनुभव सांगितला. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं. तसंच कलाकार म्हणून त्यांच्यातील कोणते गुण शिकले पाहिजेत, याबद्दलही मत व्यक्त केलं.
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणं म्हणजे व्हायरसबरोबर काम केल्यासारखं आहे : किरण कुमार
रेड एफएमच्या पॉडकास्टमध्ये किरण कुमार म्हणाले, “अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एखाद्या व्हायरसबरोबर काम केल्यासारखं आहे. ते इतके उत्तम कलाकार आहेत की, त्यांच्या कामातली ऊर्जा तुमच्या शरीरात आपसूकच येते. तुम्ही त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ते ज्याप्रकारे तुम्हाला वागवतात त्यातून बाहेर येणं कठीण होतं.”
पुढे अमिताभ यांच्या कामाबद्दल किरण म्हणाले, “काही कलाकार असे असतात की, चित्रपटात एखादा खलनायक त्यांना मारत असेल, तर ते काहीच प्रतिसाद देत नाहीत. पण अमिताभ बच्चन तसे नाहीत. चित्रपटात मी त्यांच्याबरोबर काही अॅक्शन सीन्स केले, त्या प्रत्येकवेळी त्यांनी मला योग्य तो प्रतिसाद दिला. ते खूपच उत्तम कलाकार आहेत.”
यानंतर किरण यांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक करत म्हटलं, “अमिताभ बच्चन यांना जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती असते. तुम्ही कुठल्याही विषयावर त्यांच्याशी बोलू शकता. पण त्यांच्याकडून मी एक गोष्ट शिकली, ती म्हणजे अमितजी त्यांना बोलायचं असेल तेव्हाच तुमच्याशी बोलतात.”