अभिनेते परेश रावल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून ते ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचा भाग नसणार असं म्हटलं जात होतं. अशातच आता नुकताच त्यांनी याला दुजोरा देत ही बातमी खरी असल्याचं म्हटलं होतं. यादरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये व परेश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद असल्याचं म्हटलं जात होतं. तर यामुळेच त्यांनी चित्रपटात बाबू भैया ही भूमिका साकारण्यास नकार दिल्याचंही म्हटलं गेलं.
परेश रावल यांनी गेल्या काही दिवसांत काही मुलाखती दिल्या. यातील ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ते ‘हेरा फेरी ३’मध्ये नसणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. यासह त्यांनी “कायदेशीर अडचणी, वेळापत्रकातील अडचणी आणि कलाकारांच्या अडचणी, हा कदाचित चित्रपटाला सध्या भेडसावणारा मोठा अडथळा आहे,” असंही म्हटलं होतं. यानंतर परेश रावल यांच्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसली.
अशातच आता नुकतीच त्यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, “मला हे सांगायला आवडेल की, ‘हेरा फेरी ३’ मध्ये काम न करण्याच्या निर्णयामागे माझे चित्रपटाच्या निर्मात्यांसह वैचारिक मतभेद आहेत असं कुठलंही कारण नाहीये. तर मला चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शनबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे.” एक्सवर पोस्ट करीत त्यांनी ही माहिती दिली आहे.
‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. हे दोन्ही चित्रपट हिंदीतील गाजलेले कॉमेडी चित्रपट आहेत. आजही या चित्रपटांची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटातील राजू, शाम व बाबू भैया या त्रिकुटानेतर प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं; त्यामुळे या त्रिकुटाचा चाहतावर्गही मोठा आहे. यामधील अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल यांचा ऑनस्क्रीन बाँड प्रेक्षकांना विशेष आवडला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग ‘हेरा फेरी ३’सुद्धा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, यावेळी बाबू भैयाच्या भूमिकेत परेश रावल नसणार आहेत.