Marathi Singer rejected to Madhuri Dixit: ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. पण, अभिनय क्षेत्रातील तिचा सुरुवातीचा काळ खडतर होता. सुरुवातीच्या चित्रपटांतून तिला लोकप्रियता मिळाली नव्हती.
इतकेच नाही, तर माधुरी दीक्षितचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग फ्लॉप ठरले. त्यामुळे तिने लग्न करावे, असे तिच्या आई-वडिलांना वाटत होते. तिच्या पालकांनी ज्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी संपर्क साधला होता, त्याने हो म्हटले असते, तर कदाचित माधुरी बॉलीवूडची यशस्वी अभिनेत्री झाली नसती.
त्यानंतर सुभाष घईंनी माधुरीला पाहिले. ‘तेजाब’मधील तिचा अभिनय त्यांनी पाहिला होता. त्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला ‘राम लखन’ या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. त्यानंतर माधुरी दीक्षितने मागे वळून पाहिले नाही. आज माधुरी बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून लोकप्रिय आहे.
“माधुरीचे करिअर अगदीच…”
आता रझा मुराद यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी दीक्षितबाबत वक्तव्य केले. त्याबरोबरच एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात नशीब ही खूप मोठी गोष्ट असते, असेही ते म्हणाले. अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देत रझा मुराद म्हणाले की, ‘जंजीर’ चित्रपट गाजण्याआधी अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले होते.”
“त्यानंतर ते माधुरी दीक्षितबद्दल म्हणाले, “तिने ‘आवारा बाप’, ‘अबोध’सारख्या महत्त्वाच्या चित्रपटांत काम केले. कोणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. ती कोणाच्या नजरेत आली नाही. तिच्या पालकांनी तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण- माधुरीचे करिअर अगदीच सुमार चालू होते. तिच्या पालकांनी एका पार्श्वगायकाशी संपर्क साधला. त्यांची भेट घालून दिली. जेव्हा तो भेटला, तेव्हा तो गायक माधुरीकडे पाहून म्हणाला की, ती खूप बारीक आहे.”
पुढे रझा मुराद म्हणाले, “काही काळानंतर माधुरी काश्मीरमध्ये राजेश खन्ना यांच्याबरोबर शूटिंग करत होती. त्यादरम्यानच सुभाष घईदेखील तिथे गेले होते. त्यावेळी त्यांची भेट माधुरीबरोबर झाली. त्यांनी तिला मुंबईमध्ये भेटण्यास सांगितले. त्यांनी तिला राम लखन या चित्रपटातून पुन्हा लाँच केले. कारण-सुभाष घईंना माणसांची पारख होती. जर त्यांनी तिला त्या चित्रपटात भूमिका दिली नसती, तर तिचे इतके उत्तम करिअर घडू शकले नसते.”
‘द इंडियन एक्सप्रेस’नुसार, २०२३ मध्ये ‘सा रे गा मा पा’ या रिअॅलिटी शोमध्ये लोकप्रिय गायक सुरेश वाडकर पत्नीसह यांनी हजेरी लावली होती. ‘सा रे गा मा पा’चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने सुरेश वाडकर यांना विचारले की तुमच्याबद्दल अशा चर्चा आहेत की एका ८०-९०च्या लोकप्रिय अभिनेत्रीच्या पालकांनी त्यांच्या मुलीसाठी तुम्हाला लग्नाची मागणी घातली होती, हे खरे आहे का? आदित्यचा प्रश्न ऐकल्यानंतर सुरेश वाडकर त्यांनी त्यांच्या पत्नीकडे पाहिले. त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारले की पद्मा असे काही झाले होते? यावर पद्मा वाडकर हसून म्हणाल्या की तुम्हालाच माहित आहे.
यावर सुरेश वाडकर पुढे म्हणाले की, ते आयुष्यात खूप समाधानी आहेत. त्यांच्या आयुष्यात ‘पद्मा नावाची माधुरी’ असल्याने ते खूप आनंदित आहेत. मी टेलिव्हिजनवर विचारु इच्छित आहे की माधुरी खरंच असं काही झालं होतं का? सुरेश वाडकर त्यावेळी असेही म्हणालेले की, मी माधुरीजींचा खूप मोठा चाहता आहे. देव त्यांना कायम आनंदित ठेऊ दे, हीच प्रार्थना आहे.
टेलिव्हिजनच्या राष्ट्रीय वाहिनीवर त्यांनी जे सांगितले, त्याबद्दल एक दिवस त्यांना फटकारले जाण्याची शक्यता आहे, असे सुरेश वाडकर गमतीत म्हणाले होते.
१९९९ मध्ये माधुरीने अमेरिकेतील डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्यानंतर कुटुंबासाठी काही काळ अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. २००० च्या दशकाच्या मध्यात ती डॉ. नेने आणि त्यांच्या दोन मुलांसह भारतात परतली. सध्या अभिनेत्री मराठी हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.