‘मसान’, ‘उरी’, ‘सॅम बहादूर’ अशा अनेक चित्रपटांमधून आपली भूमिका चोख साकारणारा अभिनेता म्हणजेच विकी कौशल. विकी ‘छावा’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच विकीचा या चित्रपटातील अनसीन फोटो लिक झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

२३ एप्रिलला विकीचे ‘छावा’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोजमध्ये विकी मोठ्या दाढी-मिशीत दिसतोय, तर त्याचे भले-मोठे केस रुद्राक्ष माळेने वर बांधलेले दिसतायत. फिकट तपकिरी रंगाचा स्लीवलेस कुरता त्याला मॅचिंग असे धोतर आणि कमरेभोवती गुंडाळलेला लाल रंगाचा कपडा, तसेच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अशा या विकीच्या परिपूर्ण लूकने चाहत्यांना भुरळ पाडलीय.

‘छावा’ चित्रपटातील अभिनेत्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. याचाच एक फोटो एक्सवर एका चाहत्याने शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्याने लिहिलं, “कोणत्याही पात्रासारखं हुबेहूब दिसणं हे खरंच खूप कठीण काम आहे.”

हेही वाचा… ‘जवान’मधील ‘जिंदा बंदा’ गाण्यावर थिरकले सुपरस्टार मोहनलाल; शाहरुख खान म्हणाला, “मी तुमच्याइतकं जरी चांगलं…”

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपूत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलसह नॅशनल क्रश रश्मिका मंदानादेखील आहे. विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिकाने त्यांची पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा… भाची आरती सिंहच्या लग्नात गोविंदा सहभागी होणार का? कश्मीरा शाह म्हणाली, “…मी त्यांच्या पाया पडेन”

रश्मिकाने नुकतंच या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे शूटिंग पूर्ण केलं. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर कॅप्शन देऊन ‘छावा’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि सहकलाकार विकीचेही तिने आभार मानले.

हेही वाचा… पत्नी अर्पिता खानला केलं जातं अजूनही ट्रोल; आयुष शर्मा म्हणाला, “लोकं तिच्या रंगाची चेष्टा…”

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा बायोपिक चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या कॉमेडी चित्रपटानंतर विकी आणि लक्ष्मण उतेकर यांचा हा एकत्रित दुसरा चित्रपट आहे.

‘छावा’व्यतिरिक्त विकी ‘बॅड न्यूज’ आणि ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे; तर रश्मिका ‘पुष्पा २: द रुल’, ‘रेनबो’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ या तेलुगू चित्रपटांमार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.