Vicky Kaushal Announcement : अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. त्याने सिनेमात साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. चित्रपट समीक्षक असो किंवा प्रेक्षक सगळेजण विकीचा अभिनय पाहून गहिवरल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

विकी कौशल सध्या ‘छावा’च्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रमोशन, मुलाखतींना उपस्थिती लावताना दिसतोय. यादरम्यान त्याने चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सर्वात आधी रायगडावर जायचंय असं म्हटलं होतं. अखेर अभिनेता त्याचा हा शब्द पाळणार आहे, विकी कौशल १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगडावर जाणार आहे. याबाबत विकीने व्हिडीओ शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे.

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवप्रेमी यानिमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात, महाराजांच्या गड-किल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी तरुणपिढीला मार्गदर्शन केलं जातं. अशाप्रकारे हा शिवजयंती उत्सव विविध भागात साजरा केला जातो. याशिवाय स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याठिकाणी शिवप्रेमींसह बरेच मान्यवर शिवजयंतीला उपस्थित असतात. यंदा बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सुद्धा महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडावर जाणार आहे.

विकी कौशलने घेतला महत्त्वाचा निर्णय

“नमस्कार, उद्या १९ फेब्रुवारी आहे… आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मी स्वराज्याच्या राजधानीत म्हणजेच रायगडावर जात आहे. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करूयात, त्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषाने साजरी करूयात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे!” असा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत विकीने रायगडावर येणार असल्याची घोषणा केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर या चित्रपटाने १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या ४ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १४५ कोटींचा गल्ला जमावला आहे. सध्या ‘छावा’ला सिनेमागृहांमध्ये तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, अक्षय खन्ना, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, संतोष जुवेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.