Video of audience crying after watching movie Saiyaara: मोहन सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अहान पांडे आणि अनित पड्डा प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड्स मोडण्यास सुरुवात केली आहे.

अहान पांडेचा पदार्पणाचा चित्रपट असून त्याची भूमिका कशी असणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अहानच्या अभिनयाचे मोठे कौतुक होताना दिसत आहे, तर अनितच्या अभिनयालादेखील प्रेक्षक भरभरून दाद देताना दिसत आहेत.

आता या सगळ्यात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यामध्ये चित्रपट पाहताना रडून काहीजण बेशुद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. काहीजण मोठ्याने रडताना दिसत आहेत, तर काहीजण दु:खात स्वत:चेच कपडे फाडताना दिसत आहेत.

‘सैयारा’ पाहिल्यानंतर प्रेक्षक रडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल

आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा आणि मुलगी चित्रपट पाहायला गेले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर मुलगी मोठमोठ्याने रडत असल्याचे दिसत आहे, तर तिच्याबरोबर असलेला मुलगा तिला समजावत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही या व्हिडीओमधील मुलीचे रडणे थांबत नसल्याचे दिसत आहे.

यावर नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. आता अनेकांनी पैसे घेऊन अशा प्रकारची रील्स बनवून चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचे म्हटले आहे. अशा रील्सला अनेकांनी पेड प्रमोशन (Paid Promotion) म्हटले आहे. जाणून घेऊयात नेटकरी काय म्हणाले.

नेटकरी काय म्हणाले?

एका नेटकऱ्याने लिहिले, “कलाकारांच्या मुलांपेक्षा प्रेक्षक जास्त चांगला अभिनय करत आहेत.” त्यावर दुसऱ्या एकाने लिहिले की, मला फक्त इतकेच जाणून घ्यायचे आहे की यासाठी त्यांना किती पैसे मिळत आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “पहिल्या दोन-तीन सेंकदामध्ये तिने रडण्याचा चांगला प्रयत्न केला”, त्यावर एकाने लिहिले, “तिच्याजवळ बसलेला मुलगादेखील त्याचे हसू थांबवू शकला नाही”, आणखी एकाने लिहिले की, हिच्या ओव्हरअॅक्टिंगचे ५० रुपये कापा. एका नेटकऱ्याने लिहिले की रडत असलेल्या मुलीच्या पाठीमागचे प्रेक्षक ठीक दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटाचे पाच दिवसांचे एकूण कलेक्शन १३२.२५ कोटी इतके झाले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.