Vidhu Vinod Chopra on Munna Bhai MBBS Movie: विधू विनोद चोप्रा हे त्यांच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रोडक्शनचे पीके, ३ इडियट्स, संजू हे चित्रपट चांगलेच गाजले. मुन्ना भाई एमबीबीएस हा त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट मानला जातो.
२००३ साली प्रदर्शित झालेला मुन्ना भाई एमबीबीएस हा चित्रपट चांगला गाजला. या चित्रपटात अभिनेते संजय दत्त, अर्शद वारसी, बोमन इराणी, जिम्मी शेरगिल, ग्रेसी सिंग प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केले होते. तर निर्माते विधू विनोद चोप्रा आणि वीर चोप्रा हे होते.
विधू विनोद चोप्रा काय म्हणाले?
विधू विनोद चोप्रा यांनी नुकतीच स्क्रीनशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला, “सुरुवातीला मुंबईबाहेरील वितरकांनी या चित्रपटाला नकार दिला होता. मात्र, नंतर या चित्रपटाने मोठे यश मिळवले. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी थिएटर्स रिकामे होते. प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता. पण, नंतर या चित्रपटाला गर्दी झाली. मुन्ना भाई एमबीबीएस हा असा चित्रपट आहे, ज्याने मला श्रीमंत बनवले. कारण, कोणी हा चित्रपट विकत घेतला नाही.”
पुढे त्यांनी एक किस्सा सांगितला. एका दाक्षिणात्य वितरकाने फक्त ११ लाख रुपयांना या चित्रपटाचे हक्क विकत घेतले. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने चित्रपटाला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहिले आणि त्याने माघार घेतली. चित्रपटातील भाषा मुंबईबाहेरील प्रेक्षकांना कळत नसल्याचे त्याने मला सांगितले. तो मला म्हणाला की सर, हा चित्रपट थिएटरमध्ये एक दिवसही चालणार नाही. मुंबईबाहेरील कोणालाही मुन्नाभाईची भाषा समजणार नाही.”
दक्षिणेत मोठा वितरक ओळखीचा नसल्याने विधू विनोद चोप्रा यांनी मित्रांची मदत घेण्याचे ठरवले. त्यांनी त्यांचे मित्र श्याम श्रॉफ आणि बाला श्रॉफ यांची मदत घेतली. विधू चोप्रा म्हणाले, त्यांची कंपनी आहे. मला चेन्नईमध्ये ११ च्या शोसाठी एक थिएटर मिळाले. मी ५ लाखांच्या चित्रपटांच्या जाहिरातीच्या प्रिंट काढल्या. त्या एक थिएटरमधून मला १ कोटी रुपए मिळाले होते. ते असेही म्हणाले की चांगले कथानक असेल तर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
दरम्यान, मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. संजय दत्त यांच्या अनेक गाजलेल्या भूमिकांमध्ये त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेचादेखील समावेश होतो.