बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने २० वर्षांमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. विविध चित्रपटांमध्ये तिने बऱ्याच दमदार भूमिका साकारल्या. तिने बोल्ड भूमिकाही केल्या आहेत. ‘द डर्टी पिक्चर’, ‘दो और दो प्यार’सह अनेक चित्रपटांमध्ये तिने इंटिमेट सीनही दिले आहेत. अशाच एका सीनच्या शूटिंगचा अनुभव तिने सांगितला.
इंटिमेट सीन शूट करण्याआधी अभिनेत्याने चायनीज खाल्ले होते आणि त्याने ब्रशही केला नव्हता, असं विद्याने सांगितलं. विद्या इंडस्ट्रीत नवीन असताना हा अनुभव तिला आला होता. त्यावेळी खूप घाबरले होते, असंही विद्याने नमूद केलं. याचबरोबर विद्याने अभिनेत्री म्हणून असुरक्षित वाटत नसल्याचं वक्तव्यही केलं आहे.
इंटिमेट सीनबद्दल काय म्हणाली विद्या बालन?
एका मुलाखतीत विद्या बालनने इंटिमेट सीन शूट करताना तिला आलेला अनुभव शेअर केला, याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना विद्याने सांगितलं की शूटिंग दरम्यान अभिनेत्याने चायनीज पदार्थ खाल्ले होते आणि ब्रश केला नव्हता. त्यांना त्या सीनमध्ये एकमेकांच्या खूप जवळ यायचं होतं. “मी खूप नवीन होते, मी खूप घाबरले होते. मी मनातल्या मनात स्वतःलाच समजावत होते की हा तुझा जोडीदार नाही,” असं विद्या बालन म्हणाली.
विद्या बालन स्वतःला म्हणाली, ‘निर्लज्ज आशावादी’
एक अभिनेत्री म्हणून असुरक्षित नसल्याचं विधान विद्या बालनने केलं. विद्या म्हणाली, “मला वाटते की मी एक निर्लज्ज आशावादी आहे. माझा स्वतःवर खूप विश्वास आहे. मी पूर्ण क्षमतेने काम केलंय. मला स्वतःवर काम करायला सांगणाऱ्या बऱ्याच लोकांना मी भेटलेय. अनेकांनी मला वजन कमी करायला सांगितलं. पण मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि म्हटलं की माझ्यात काहीच कमतरता नाही. मला वाटतं की हा चांगला अॅटिट्यूड आहे, कारण मला यामुळे खूप मदत झाली.”
विद्याने त्याच मुलाखतीत तिला पहिला चित्रपट ‘परिणीता’मधील संजय दत्तबरोबरच्या पहिल्या इंटिमेट सीनचा उल्लेख केला. विद्या हा सीन करताना खूप घाबरली होती. संजय दत्तने तिला कंफर्टेबल करण्यासाठी म्हणालेला, “विद्या, मी खूप घाबरलोय. हा सीन आपण कसा करायचा?” विद्या हसत म्हणाली की संजयसारख्या अनुभवी व्यक्तीचं हे म्हणणं ऐकून तिला आश्चर्य वाटलं होतं.
करिअरच्या सुरुवातीला विद्या बालनला इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागला होता. तिला अनेक नकारांना सामोरं जावं लागलं होतं. तिला अनेक चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. विद्या या नकारांना इतकी कंटाळली होती की एकदा तिने ६ महिने आरशात स्वतःचा चेहरा पाहिला नव्हता. नंतर मात्र तिला संधी मिळाली आणि तिने मागे वळून पाहिलं नाही. तिने करिअरमध्ये ‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘इश्किया’, ‘भूल भुलैया’ व ‘जलसा’सह अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.