Vidya Balan Lost 9 Films : विद्या बालन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विद्याने आजवर कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यास पसंती दिलेली तिच्या चित्रपटांतून पाहायला मिळतं. अशातच अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या एका प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.
विद्याने रॉड्रिगो कॅनेलासशी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यामध्ये तिने जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. तिने तिचा पहिला चित्रपट ‘चक्रम’बद्दल सांगितलं आहे, ज्यामधून तिचं पदार्पण होणार होतं. पंरतु, तो चित्रपट पुढे बनलाच नाही. या मुलाखतीमध्ये विद्याने सांगितलं की, “मी चित्रपटासाठी काम करायला सुरू केलं, सगळं छान सुरू होतं. पण, १५ दिवसांनंतर त्यांनी मला पुन्हा मुंबईला पाठवलं. एक सीन केल्यानंतर ते म्हणाले शेड्यूल संपलं आणि त्यांनी मला मुंबईला पाठवलं.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण बाकी होतं, पण नंतर मला समजलं की चित्रपटाचं शूटिंग पूर्ण बाकी असताना (मोहनलाल प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते) आणि दिग्दर्शकामध्ये काही तरी झालेलं. पण, मला वाटलं चित्रपटाचं शूटिंग असंच चालतं, म्हणून मीसुद्धा पुन्हा मुंबईला आले.” विद्या बालनने यासह तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दलही सांगितलं आहे.
ती म्हणाली, तिला करिअरच्या सुरुवातीला ‘चक्रम’ या चित्रपटाची ऑफर मिळालेली आणि हा तिच्यासाठी फार महत्त्वाचा चित्रपट होता, यातून ती पदार्पण करणार होती. दक्षिणमध्ये एका जाहिरातीच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असतानाच तिला या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला सांगितलं. ऑडिशननंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तिला भेटायला बोलावलं आणि या चित्रपटासाठी तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. परंतु, या चित्रपटातून पदार्पण करण्याचं तिचं स्वप्न अर्धवटच राहिलं.
विद्या बालनचं या चित्रपटातून पदार्पण करण्याचं स्वप्नतर अर्धवट राहिलंच, परंतु यामुळे तिचं मोठं नुकसानही झालं होतं. ‘चक्रम’ चित्रपटात विद्या बालन काम करतेय समजल्यानंतर ती चर्चेत आली आणि तेव्हा तिला इतर ८-९ चित्रपटांसाठी विचारणा झाली होती. अभिनेत्री म्हणाली, “मला असं वाटत होतं की मी स्टार आहे वगैरे, पण पुढे असं काही होणार आहे याबाबत मला कल्पना नव्हती. ‘चक्रम’चं चित्रीकरण थांबल्यानंतर मला ज्या चित्रपटांची ऑफर आलेली, ते सर्व चित्रपट मला गमवावे लागले”.
विद्याचं ‘चक्रम’मधून पदार्पण करण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं असलं तरी नंतर अभिनेत्रीने की परिणीता या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यासह तिने आजवर ‘भूल भूलैया’, ‘कहानी’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.