Vidya Balan : विद्या बालन मध्यंतरीची काही वर्षे बॉलीवूडपासून दूर होती. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या ३’मधून अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर दणक्यात कमबॅक केलं होतं. विद्याने आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. विद्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विद्याने मराठमोळ्या अंदाजात एक मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम यांची नक्कल करताना दिसत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामधील निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या गाजलेल्या स्किटवर विद्या बालनने मजेशीर व्हिडीओ बनवला आहे.

विद्या बालनने निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या व्हॉइस ओव्हरवर हा व्हिडीओ बनवला आहे. यातील संवाद फारच मजेशीर आहेत…

निलेश साबळे – तुला गाडी चालवता येत नाही का?

भाऊ कदम – येते पण, मला दोन-तीन वेळा दंड बसला होता म्हणून मी चालवत नाही.

निलेश साबळे – का दंड बसला?

भाऊ कदम – माझा जरा सिग्नलचा प्रॉब्लेम होतो…

निलेश साबळे – अरे…लहान मुलाला पण हे समजतं. लाल म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे निघा आणि पिवळा रंग म्हणजे अलर्ट राहा.

भाऊ कदम – असं आहे का…मला वाटलं लाल म्हणजे नॉनव्हेज खाणारे पुढे जा, हिरवा म्हणजे व्हेजवाले चला आणि पिवळा म्हणजे उपवासवाले…

निलेश साबळे – गप्प बसा

विद्या बालन मराठी चित्रपटात झळकणार…

विद्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी अभिनेत्रींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने चाहत्यांना मोठी हिंट दिली आहे. लवकरच ती मराठी चित्रपटात झळकणार आहे. विद्या लिहिते, “मराठी रील व्हिडीओ शेअर करतेय कारण…सध्या मी मराठी चित्रपटासाठी शूटिंग करतेय…काय समजलं?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच विद्या बालनने या व्हॉईसओव्हरचं क्रेडिट डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनाही दिलं आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता विद्या कोणत्या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.