Vidya Balan Supports Deepika Padukone For Eight Hours Shift Demand : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबरच्या ‘स्पिरीट’ चित्रपटातून माघार घेतली. याचं कारण होतं – तिने केलेली आठ तासांच्या कामाची मागणी. आठ तासांच्या कामाच्या मागणीवरुन एकमत न झाल्याने अभिनेत्रीने हा चित्रपट सोडला. यानंतर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी कामाचे तास आणि काम करण्याच्या पद्धतीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अशातच आता यावर अभिनेत्री विद्या बालनने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’शी बोलताना विद्या म्हणाली, “आज अनेक क्षेत्रात आई झालेल्या स्त्रियांच्या गरजा लक्षात घेऊन कामाच्या वेळांमध्ये बदल केले जात आहेत. आई असलेल्या स्त्रियांना वेळेत काम करण्याचा पर्याय मिळायला हवा, हे योग्यच आहे.”
विद्या पुढे म्हणाली, “स्त्रियांनी आपलं काम थांबवू नये, म्हणून अनेक कंपन्या हे बदल करत आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीतही हे व्हायला हवं. मी आई नाही, त्यामुळे रोज १२ तास काम करते. मला लहान बाळ नसल्यामुळे रोज १२ तास काम करणं शक्य होतं. पण जे चित्रपट मी करते, त्यात फक्त आठ तासांत काम पूर्ण करणंही कठीण असतं.”
तरअ याबद्दल ‘अॅनिमल’ चित्रपटात संदीप रेड्डी वांगा यांच्यासह काम केलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्नानेसुद्धा यावर मत मांडलं. मोजो स्टोरीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “प्रत्येक चित्रपटाचं काम वेगळं असतं. कामाचे तास किती असावेत, हे कलाकार आणि दिग्दर्शकांनी आपापसात ठरवायला हवं. याबद्दल टीमने मिळून निर्णय घेतला पाहिजे.”
दीपिका पदूकोण इन्स्टाग्राम
दीपिकाला ‘स्पिरिट’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, काही वृत्तांनुसार, तिच्या काही अटी मान्य न झाल्यामुळे तिने हा चित्रपटातून एक्झिट घेतली. दररोज जास्तीत जास्त आठ तासांचं चित्रीकरण, चित्रपटाच्या नफ्यातला काही टक्के वाटा, तेलुगू संवादासाठी सक्ती न करता पर्याय द्यावा अशा काही अटी अभिनेत्रीने ठेवल्या होत्या.
पण अटी मान्य झाल्याने दीपिकाने ‘स्पिरिट’मधून माघार घेतली. त्यानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) वर तिचं नाव न घेता एक नाराजी व्यक्त करणारी पोस्ट लिहिली. आता चित्रपटात दीपिकाच्या जागी त्रिप्ती डिमरीची निवड करण्यात आली आहे.