अभिनेता विजय वर्मा सध्या चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दहाड’ या वेबसिरीजमधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. याशिवाय तो अभिनेत्री तमन्ना भाटियासोबतच्या नात्यामुळेही चर्चेत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकतचं तमन्नाने विजय वर्माबरोबरच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केल्यानंतर लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विजयने त्याच्या आईशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला. विजयने त्याच्या आईला मुंबईतील त्याच्या सी फेसिंग घर दाखवले होते. यावेळी विजयने आईला घरातील त्याचा आवडता कोपराही दाखवला. या कोपऱ्यात विजयने चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू ठेवल्या होत्या. या फोटोंमध्ये त्यांचा आणि आलियाचा लग्नाचा फोटोही होता. हा फोटो पाहून विजयची आई घाबरली होती. तू लग्न केलंस? असा प्रश्न आईने विजयला विचारला होता. या प्रश्नावर विजयने उत्तर देत हा ‘डार्लिंग्स’च्या सेटवरचा माझा आणि आलियाचा फोटो आहे. हा फोटोशॉप्ड असल्याचा खुलासा केला होता.
दरम्यान विजयने आलियाबरोबर काम करतानाचा अनुभवही शेअर केला. विजय आणि आलियाने गली बॉय आणि डार्लिंग्समध्ये एकत्र काम केले आहे. विजय म्हणाला “तिच्याबरोबर काम करणे खूप सोपे आहे. ती खूप व्यावसायिक आहे. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी एकच गोष्ट दोनदा करत नाही. त्यामुळे प्रत्येक शॉटमध्ये ती काहीतरी नवीन करते.”
जेनिस सिक्वेराच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विजयला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील आवडत्या गोष्टींबद्दल विचारण्यात आलं होतं. त्याचं विजयने उत्तर दिलं. “तुम्ही योग्य वेळ आल्यावर त्याबद्दल बोलता पण मी तुम्हाला सांगू शकतो की माझ्या आयुष्यात सध्या खूप प्रेम आहे मी आनंदी आहे,” असं तो म्हणाला. लोकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा कामाबद्दल जास्त बोलावं, असं मतही विजयने मांडलं होतं.