Vijayta Pandit talks about Sulakshana Pandit Sanjeev Kumar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. सुलक्षणा पंडित यांचं दिवंगत दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांच्यावर प्रेम होते, त्यांच्याशी लग्न करायचे होते. सुलक्षणांनी त्यांना प्रपोजही केलं होतं. पण तेव्हा संजीव हेमा मालिनींनी नकार दिल्याने प्रेमभंगात होते. त्यामुळे सुलक्षणाच्या प्रेमाचा स्वीकार त्यांनी केला नाही. याबद्दल सुलक्षणाची बहीण विजयता पंडित यांनी काही गोष्टी सांगितल्या. संजीव यांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने धक्का बसला, पुढे संजीव कुमार यांच्या निधनानंतर सुलक्षणा नैराश्यात गेल्या, असा खुलासा विजयता पंडित यांनी केला.

“संजीव कुमार यांनी तिचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तिला धक्का बसला. त्यांनी तिचा प्रस्ताव नाकारला हे तिला सहन होत नव्हतं. संजीव यांच्या मृत्यूनंतर ती नैराश्यात गेली,” असं विजयता पंडित विकी लालवानीशी बोलताना म्हणाल्या.

संजीव कुमार यांनी सुलक्षणाचा प्रस्ताव का नाकारला? असं विचारल्यावर विजयता म्हणाल्या, “ते दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत होते.” त्या हेमा मालिनी होत्या का, असं विचारलं असता विजयता म्हणाल्या, “मला तिचं नाव घ्यायचं नाही आणि कोणाचीही प्रतिमा खराब करायची नाही, पण जगाला माहिती आहे. मी तिचे नाव घेऊ इच्छित नाही, ती एक चांगली महिला आहे.”

संजीव कुमार आमच्या घरी यायचे – विजयता पंडित

सुलक्षणा यांचे संजीववर एकतर्फी प्रेम होते का? असं विचारल्यावर विजयता म्हणाल्या, “संजीव कुमार आमच्या घरी यायचे आणि माझी आई त्यांच्यासाठी जेवण बनवायची. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारायचो. त्यावेळी त्यांनी आम्हाला शोलेची कथा सांगितली होती. ते आमच्या घरी वारंवार यायचे. त्यांना सुलक्षणा खूप आवडायची. प्रेमभंगानंतर ते सुलक्षणाबरोबर तासनतास बसायचे.” हेमा मालिनीशी लग्न करू न शकल्यामुळे ते दु:खी होते का? असं विचारल्यावर विजयता “हो” म्हणाल्या.

सुलक्षणा खूप साधी होती – विजयता पंडित

हेमा मालिनी यांनी लग्नानंतर सिनेमे करू नये, अशी अट संजीव कुमार यांनी ठेवली होती. पण हेमा यांनी अट मान्य केली नाही आणि लग्न मोडलं, असं म्हटलं जातं. “ते सुलक्षणावर प्रेम करत होते की नाही हे मी सांगू शकत नाही पण ते तिला पसंत करायचे. ते तिच्याबरोबर मस्करी करायचे, वारंवार घरी यायचे. सुलक्षणा खूप साधी होती. तिला संजीवबरोबर लग्न करायचं होतं. पण ते जास्त काळ जगणार नाही, याची कल्पना त्यांना होती, म्हणून कदाचित त्यांनी तिच्याशी लग्न केलं नाही,” असं विजयता पंडित म्हणाल्या.

सुलक्षणा पंडित यांना काय झालं होतं?

संजीव यांच्या मृत्यूनंतर सुलक्षणाला वेड लागल्याच्या चर्चा विजयता यांनी फेटाळल्या. “त्यांच्या मृत्यूनंतर तिला मोठा धक्का बसला. ती वेडी झाली, असं मी म्हणणार नाही. कारण ती आयुष्यात एकदाही मेंटल हॉस्पिटलला गेली नाही. या सर्व अफवा आहेत,” असं विजयता यांनी नमूद केलं. “बाथरूममध्ये पडल्याने सुलक्षणाच्या कंबरेचं हाड मोडलं आणि त्यामुळे ती आजारी पडली. ती १५ वर्षे अंथरुणाला खिळून होती,” असं विजयता म्हणाल्या.

संजीव कुमार यांचं निधन ६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले होते. बरोबर ४० वर्षांनी त्याच तारखेला म्हणजेच ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सुलक्षणा पंडित यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दल विजयता म्हणाल्या, “मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा चमत्कार पाहिला नव्हता. ती इतकी वर्षे गेली नाही, पण संजीव कुमार यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी तिचा मृत्यू झाला. या जगात आता असं प्रेम कोण करतं?”

संजीव कुमारबद्दल बोलताना विजयता पंडित म्हणाल्या, “त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडायचं. आम्ही सगळे शाकाहारी होतो, पण त्यांच्यासाठी आम्ही मांसाहारी जेवण बनवायचो. संजीवच्या प्रेमात पडल्यावर सुलक्षणाने कधीही कोणाकडे पाहिलं नाही. तिने त्यांना म्हटलं होतं, ‘मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.’ पण त्यांनी तिला कधीही सरळ उत्तर दिलं नाही. पाहू, करू, बघू असंच ते म्हणायचे. ते कधीही हो म्हणाले नाही आणि कधीही नाही म्हटलं नाही.”